Mahabreaking

[breaking_news]

Life-threatening attack :तहसील डोंगरजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास सोमवारपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

Life-threatening attack :देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात अवैध गौण खनिज नियंत्रणासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाहन घालून जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप करत विदर्भ पटवारी संघाच्या बुलढाणा जिल्हा शाखेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न झाल्यास सोमवारपासून बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांनी दिला आहे.

Life

  रेती माफियांची मुजोरी खपवून घेणार नाही; पटवारी संघ आक्रमक, जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

गजानन तिडके

देऊळगाव राजा: देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात अवैध गौण खनिज नियंत्रणासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाहन घालून जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप करत विदर्भ पटवारी संघाच्या बुलढाणा जिल्हा शाखेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न झाल्यास सोमवारपासून बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांनी दिला आहे.

दि. १९ ऑगस्ट रोजी तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), शिपाई व चालक यांचा समावेश असलेले अवैध गौण खनिज नियंत्रण पथक अंढेरा परिसरात कर्तव्य बजावत होते. यावेळी रेती माफिया हर्षल मनोहर अंभोरे व त्याच्या साथीदारांनी पथकाच्या दिशेने वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पटवारी संघाने निवेदनातून केला आहे. या हल्ल्यात महसूल पथकातील अधिकारी व कर्मचारी थोडक्यात बचावल्याचे संघटनेने म्हटले आहे.

या घटनेचा विदर्भ पटवारी संघाने तीव्र निषेध नोंदविला असून, अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याबद्दल संघटनेने संताप व्यक्त केला आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यात वारंवार हल्ले होत असतानाही त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

‘अशा दहशतीच्या वातावरणात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी कर्तव्य कसे बजावणार?’ असा सवाल उपस्थित करत संघटनेने प्रशासनाला धारेवर धरले आहे.

पटवारी संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये हल्ल्यातील मुख्य आरोपीसह सर्व संबंधितांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करणे, तसेच अवैध गौण खनिज उत्खनन, अतिक्रमण निर्मूलन यांसारख्या संवेदनशील कारवायांमध्ये सहभागी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देणे, यांचा समावेश आहे.

दरम्यान, देऊळगाव राजा तालुका शाखेने यापूर्वीच प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे. आरोपींना तातडीने अटक करून महसूल कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी न दिल्यास आंदोलन केवळ तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता उपविभागीय आणि जिल्हास्तरावर अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांनी दिला आहे.

तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या प्रशासकीय अथवा कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे आणि सचिव शिवानंद वाकदकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, अमरावती, पोलीस अधीक्षक बुलढाणा, उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा तसेच संघटनेच्या संबंधित शाखांना देण्यात आल्या आहेत.

‘शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना संरक्षण नव्हे, तर कठोर कारवाई हवी; अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारू,’ अशी आक्रमक भूमिका विदर्भ पटवारी संघाने घेतल्याने आता प्रशासन आरोपींवर कोणती कारवाई करते, याकडे महसूल कर्मचाऱ्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top