Ali Public School; अली पब्लिक स्कूल, बाळापूरच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी अबुजर अहमद ऐजाज अहमद याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

६० मीटर धावणे, लांब व उंच उडीत चमकला अबुजर; रत्नागिरीत राज्यस्तरीय स्पर्धेत दाखवणार कौशल्य
बाळापूर : अली पब्लिक स्कूल, बाळापूरच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी अबुजर अहमद ऐजाज अहमद याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अबुजर अहमदची २९ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे अली पब्लिक स्कूलसह बाळापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अकोला येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अंडर-१४ ट्रायथलॉन-ए गटात अबुजर अहमदने उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.

ट्रायथलॉन-ए प्रकारात ६० मीटर धावणे, लांब उडी आणि उंच उडी या तीन क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तिन्ही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत अबुजरने सुवर्णपदक पटकावले.
अबुजरच्या या शानदार यशाबद्दल १९ ऑगस्ट रोजी अली पब्लिक स्कूलमध्ये त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी स्कूल मॅनेजमेंटचे सचिव डॉ. जुबेर नदीम, डायरेक्टर अंबर काझिम, मुख्याध्यापिका रिजवाना परवीन तसेच क्रीडा शिक्षक अरबाज खान यांनी अबुजरचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अबुजरला सातत्याने मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा शिक्षक अरबाज खान यांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचेही स्कूल मॅनेजमेंटकडून कौतुक करण्यात आले.
अबुजरचे हे यश शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून अली पब्लिक स्कूल आणि बाळापूरचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास स्कूल मॅनेजमेंटकडून व्यक्त करण्यात आला.

