Labourer injured: गुंज येथील ग्रामपंचायत विहिरीवर कामासाठी जात असताना रस्त्यावर निलगाय (रोही) आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजी धोंडूंबा तुपकर (वय ५९ वर्षे) असे मृतकाचे नाव असून, त्यांच्या निधनाने गुंज गावावर शोककळा पसरली आहे.

विहिरीवरील कामासाठी जाताना निलगाय आडवी आली; गंभीर जखमी शिवाजी तुपकर यांचे निधन
साखरखेर्डा : गुंज येथील ग्रामपंचायत विहिरीवर कामासाठी जात असताना रस्त्यावर निलगाय (रोही) आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजी धोंडूंबा तुपकर (वय ५९ वर्षे) असे मृतकाचे नाव असून, त्यांच्या निधनाने गुंज गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुंज ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आणि मजूर शिवाजी तुपकर हे दोघे १८ ऑगस्ट रोजी सकाळी शेलगाव काकडे परिसरातील कोराडी धरण क्षेत्रात असलेल्या विहिरीवरील नादुरुस्त मोटारपंप काढण्यासाठी मोटारसायकलवरून जात होते. गुंज ते शेलगाव काकडे रस्त्यावरून जात असताना अचानक निलगाय (रोही) रस्ता ओलांडत आडवी आल्याने मोटारसायकलचा अपघात झाला.
या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर काही दिवसांनी शिवाजी तुपकर यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच २५ सप्टेंबर रोजी शिवाजी धोंडूंबा तुपकर यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता गुंज गावात पोहोचताच ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्यावर २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

