Komal Mohod : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ११ लाख रुपयांच्या भव्य बक्षीस रकमेच्या ‘शिवप्रहार मुख्यमंत्री राष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील उदयोन्मुख कलाकार कोमल विनोद मोहोड हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोमलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ‘मी हरलो नाही व साथ एकनाथांची’ या लघुपटाची हजारो स्पर्धक लघुपटांमधून अंतिम ९६ अधिकृत निवडींमध्ये (Official Selection) निवड झाली आहे. या यशामुळे कोमलसह संपूर्ण चित्रपट चमूचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुरणखेडच्या कोमलच्या अभिनयाची राज्यस्तरावर दखल; हजारो लघुपटांतून प्रमोद ताजणे दिग्दर्शित कलाकृतीची निवड
आगाखान पठाण
अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ११ लाख रुपयांच्या भव्य बक्षीस रकमेच्या ‘शिवप्रहार मुख्यमंत्री राष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील उदयोन्मुख कलाकार कोमल विनोद मोहोड हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोमलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ‘मी हरलो नाही व साथ एकनाथांची’ या लघुपटाची हजारो स्पर्धक लघुपटांमधून अंतिम ९६ अधिकृत निवडींमध्ये (Official Selection) निवड झाली आहे. या यशामुळे कोमलसह संपूर्ण चित्रपट चमूचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रमोद ताजणे यांनी केले आहे. कथानकाला साजेसे प्रभावी चित्रीकरण रागिनी स्टुडिओ, मेहकरचे सुनील अंभोरे आणि रामदास भगत यांनी केले आहे. विशेष म्हणजे या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण मेहकर परिसरातील निसर्गरम्य आणि ग्रामीण वातावरणात करण्यात आले. कथेची गरज लक्षात घेऊन मेहकर शहर व परिसरातील विविध ठिकाणी चित्रपटातील प्रसंग चित्रीत करण्यात आले. गणेश खांडेकर यांनी या लघुपटाला उत्कृष्ट संगीताची साथ दिली आहे.
राज्यभरातून हजारो लघुपटांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला होता. त्यातून केवळ ९६ लघुपटांची अधिकृत निवड करण्यात आली. या निवडीत ‘मी हरलो नाही व साथ एकनाथांची’ या लघुपटाने स्थान मिळविणे, ही संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या लघुपटात कोमल मोहोड हिच्यासह गणेश चहारे, पल्लवी चापले, किसन बडी, सुरेखा सुरुशे, डॉ. सुभाष खुरद, राजेश रोकडे, गणेश मुंडे, अनुष्का सुरुशे, पूनम ठोंबरे, डॉ. अर्चना ठोसरे, सुनीता कुडके आणि बालकलाकार आदित्य कानोडजे यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. या निर्मितीसाठी गजानन नागुलवार, स्वप्नील कडासरे आणि संदीप काळे यांचे विशेष सहकार्य लाभले. दिग्दर्शक प्रमोद ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोमलसह सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी मेहनत घेत लघुपट प्रभावीपणे साकारला.
दरम्यान, कोमल मोहोड हिच्या अभिनयाची वाटचाल सातत्याने उंचावत आहे. आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ‘शेगावचा राणा’ या भव्य व्हिडिओ साँगमध्येही ती अभिनय करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या आगामी कलाकृतीबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
कुरणखेडसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोमलने मिळविलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. तिच्यासह दिग्दर्शक प्रमोद ताजणे आणि संपूर्ण चित्रपट चमूच्या कामगिरीमुळे कुरणखेड गावासह अकोला आणि मेहकर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कलाविश्वातील त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

