Jio network down :गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिलायन्सची मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा पूर्णतः बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत असली तरी त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

डोणगाव : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिलायन्सची मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा पूर्णतः बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत असली तरी त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
नेटवर्क व इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयांची कामे ठप्प झाली आहेत. ऑनलाईन बँकिंग, यूपीआय व्यवहार, शैक्षणिक उपक्रम आणि व्यावसायिक देवाणघेवाणीवर मोठा परिणाम झाला आहे. मोबाईल कॉलही लागत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील लाखो जिओ ग्राहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अत्यावश्यक दूरसंचार सेवा बंद ठेवणे ही अत्यंत गंभीर व निष्काळजीपणाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश टाले यांनी सांगितले की, “नेटवर्क सेवा ही आज अत्यावश्यक गरज बनली आहे. ती अचानक बंद होणे म्हणजे नागरिकांचे हक्क डावलण्यासारखे आहे. जिओ कंपनीने तात्काळ सेवा पूर्ववत करून संपावर तोडगा काढावा व ग्राहकांची अधिकृत दिलगिरी व्यक्त करावी; अन्यथा ग्राहक मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या दूरसंचार कंपनीकडे पोर्ट करण्याचा निर्णय घेतील.”
सेवा बंद राहिलेल्या कालावधीमुळे झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, TRAI तसेच संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तात्काळ कार्यवाही न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य भगवानराव बाजड आणि हेमराज शर्मा यांनी दिला आहे.

