jalindar budhwat : दिल्लीतील नीट परीक्षेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. या घटनांमुळे देशात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. “रात्र झाली की दिवस उगवतोच. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही. त्यामुळे निष्ठावंतांनी चिंता करण्याची गरज नाही. येणारा काळ हा उद्धव ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा असेल,” असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा : दिल्लीतील नीट परीक्षेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. या घटनांमुळे देशात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. “रात्र झाली की दिवस उगवतोच. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही. त्यामुळे निष्ठावंतांनी चिंता करण्याची गरज नाही. येणारा काळ हा उद्धव ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा असेल,” असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्रामदैवत जगदंबा देवी मंदिरात महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी २४ जुलै रोजी शेतकऱ्यांना मोफत वृक्षवाटप तसेच बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. २६ जुलै रोजी सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, तसेच बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावाही पार पडला.
यावेळी बोलताना जालिंदर बुधवत म्हणाले की, शिवसेनेमुळे सामान्य माणसाला सत्तेत प्रतिनिधित्व मिळाले. उद्धव ठाकरे हे सरळ स्वभावाचे आणि सामान्य जनतेच्या न्यायासाठी काम करणारे नेतृत्व आहे. सत्ता येत-जात असते, मात्र शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाही. आजचा निष्ठावंतांचा मेळावा संघटनेला नवचैतन्य देणारा ठरेल. सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) मोहिमेत प्रत्येक बूथ आणि गावावर लक्ष ठेवून बीएलओमार्फत मतदार नोंदणी अर्ज भरून घ्यावेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राममंदिरातील कथित चोरीप्रकरणी भाजपवर टीका : जयश्री शेळके
शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी अयोध्येतील राममंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर टीका केली. तसेच महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी, तरुणांमधील असंतोष आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याला सक्षम नेतृत्व दिल्याचा दावा त्यांनी केला.
सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या कर्जमाफीचा उल्लेख करत, शिवसेना ही शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना असल्याचे सांगितले.
जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनी अन्यायाविरोधातील प्रत्येक लढ्यात शिवसेना अग्रस्थानी राहिल्याचा दावा करत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक सुनील घाटे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, गजानन उबरहंडे, महिला आघाडीच्या प्रतीक्षा पिंपळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

