Mahabreaking

[breaking_news]

Irrigation from Khadakpurn : खडकपूर्णा प्रकल्पावर केवळ कागदोपत्री सिंचन, शेतकरी आक्रमक

Irrigation from Khadakpurn : खडकपूर्णा प्रकल्पातून गत काही वर्षापासून कागदावरच सिंचन होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येत नसल्याने   ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2026’ अंतर्गत आयोजित “पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा”त शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Irrigation from Khadakpurn

अधिकाऱ्यांना विचारला जाब;सक्षमकीरण कार्यशाळेवर शेतकऱ्यांनी टाकला बहिष्कार

गजानन तिडके

देऊळगाव राजा : खडकपूर्णा प्रकल्पातून गत काही वर्षापासून कागदावरच सिंचन होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येत नसल्याने   ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2026’ अंतर्गत आयोजित “पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा”त शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

नारायणखेड रोडवरील आई भवानी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते; मात्र अपेक्षित शेतकरी व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहिले. खडकपूर्णा विभाग, देऊळगाव राजा येथील कार्यकारी अभियंता कार्यालय तसेच लघु पाटबंधारे विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मात्र, तब्बल 61 पाणी वापर संस्था आणि सुमारे 39 हजार सदस्यसंख्या असतानाही केवळ दहा-बारा शेतकरी उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित शेतकऱ्यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “धरणात पाणी असूनही शेतीसाठी मिळत नाही,” अशी तक्रार करत पाटांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे सिंचनात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले. काही भागात शेतकऱ्यांना दगड व पत्र्यांच्या साहाय्याने पाणी अडवून शेती करावी लागत असल्याचे वास्तवही त्यांनी मांडले.

उपसा सिंचन टप्पा क्रमांक 1 ते 4 अंतर्गत पाटचारीची कामे कागदोपत्री पूर्ण दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात ती अपूर्ण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर भाषणे झाली; मात्र लाभधारक महिलांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारीच असल्याचे दिसून आले. या वेळी देऊळगाव घुबे येथील प्रतिनिधींनी पाणी वापर संस्थांच्या अडचणी मांडल्या, तर माजी अध्यक्ष मधुकर शिंगणे यांनी नियोजनशून्य कारभारावर टीका करत अपूर्ण कामांवर ताशेरे ओढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कार्यकारी अभियंता डावरे यांनी “कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व,” अशी प्रतिक्रिया दिली; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उत्तर न मिळाल्याने नाराजी कायम राहिल्याचे चित्र दिसून आले.

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या कार्यशाळा केवळ औपचारिकता ठरत आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top