Install rainfall measuring : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यांतील बंद व अकार्यक्षम पर्जन्यमापक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसवावी, अशी मागणी शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा यांनी केली आहे. यासंदर्भात समितीने तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा यांना निवेदन दिले असून एका महिन्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

बंद पर्जन्यमापकांमुळे शेतकरी विम्यापासून वंचित?; चौकशीसह कारवाईची मागणी
साखरखेर्डा : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यांतील बंद व अकार्यक्षम पर्जन्यमापक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसवावी, अशी मागणी शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा यांनी केली आहे. यासंदर्भात समितीने तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा यांना निवेदन दिले असून एका महिन्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या तीनही तालुक्यांतील पर्जन्यमापक यंत्रणांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यापूर्वी अनेक निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले; मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
समितीच्या म्हणण्यानुसार, किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणा बंद असल्याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीत केली होती. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीने असा आरोप केला आहे की, मागील वर्षी अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीची अचूक नोंद बंद किंवा अकार्यक्षम पर्जन्यमापक यंत्रणांमुळे झाली नाही. परिणामी अनेक शेतकरी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहिले.
प्रत्यक्षात हजारो एकर शेतीचे नुकसान झाले असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत होते. मात्र, जर नुकसान प्रत्यक्ष दिसत होते, तर त्याची अधिकृत नोंद पर्जन्यमापक यंत्रणांमध्ये का झाली नाही, असा सवालही समितीने उपस्थित केला आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीने निवेदनातून पुढील मागण्या केल्या आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व बंद पर्जन्यमापक यंत्रणा तात्काळ सुरू कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसवावी. दररोजचा पर्जन्यमान अहवाल सार्वजनिक करावा. योजना रखडण्यामागील कारणांची चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी.
समितीने स्पष्ट केले आहे की, निवेदन दिल्यानंतर एका महिन्याच्या आत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. वारंवार आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी, अन्यथा कृषी विभागाच्या भूमिकेविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

