New Town Authority : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ‘सावरगाव माळ नोड’ अंतर्गत प्रस्तावित नवनगर (कृषी समृद्धी केंद्र) विशेष नियोजन प्राधिकरणाची अधिसूचना प्रसिद्ध केली असली, तरी समृद्धी महामार्गालगत असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक पात्र गावे या प्रकल्पातून वंचित राहिल्याचा मुद्दा आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. या गावांचाही विशेष नियोजन प्राधिकरणात समावेश करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी आग्रही मागणी त्यांनी १ जुलै रोजी विधानसभेत केली.

आमदार मनोज कायंदे यांची विधानसभेत जोरदार मागणी; समृद्धी महामार्गालगतची गावे विकासापासून वंचित ठेवू नका
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ‘सावरगाव माळ नोड’ अंतर्गत प्रस्तावित नवनगर (कृषी समृद्धी केंद्र) विशेष नियोजन प्राधिकरणाची अधिसूचना प्रसिद्ध केली असली, तरी समृद्धी महामार्गालगत असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक पात्र गावे या प्रकल्पातून वंचित राहिल्याचा मुद्दा आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. या गावांचाही विशेष नियोजन प्राधिकरणात समावेश करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी आग्रही मागणी त्यांनी १ जुलै रोजी विधानसभेत केली.
शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार अंभोरा, जांभोरा, असोला, बामखेड, बोरखेडी, बावरा, गिरोली बुद्रुक, गिरोली खुर्द, गोळेगाव, जावळखेड, कुंभारी, निमखेड, पळसखेड मालकदेव, पळसखेड झाल्टा, पिंपळनेर आणि तुळजापूर आदी गावांचा नवनगर विशेष नियोजन प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाचा मोठा टप्पा सिंदखेडराजा तालुक्यातून जात असूनही तालुक्यातील केवळ सावरगाव माळ आणि नशिराबाद या दोन गावांचाच समावेश करण्यात आल्याकडे आमदार कायंदे यांनी शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी सिंदखेडराजा भाग-१, सिंदखेडराजा भाग-२, अंचली, निमखेड, शिवणी टाका, पांगरखेड, वाघोरा, खामगाव, खापरखुटी, महारखेड, हनवतखेड, सावखेड तेजन, उगला, पिंपळखुटा, पिंपळगाव लेंडी यांसह समृद्धी महामार्गालगतच्या इतर पात्र गावांचाही नवनगर (कृषी समृद्धी केंद्र) विशेष नियोजन प्राधिकरणात समावेश करण्याची मागणी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नवनगर (स्मार्ट सिटी) प्रकल्पाचा लाभ सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिक, शेतकरी, युवक आणि उद्योजकांनाही मिळणे आवश्यक असल्याचे सांगत, या गावांचा प्रकल्पात समावेश होण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार मनोज कायंदे यांनी दिली.विकासाच्या संधींपासून सिंदखेडराजा तालुक्यातील गावे वंचित राहू नयेत, यासाठी हा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नवनगर (स्मार्ट सिटी) प्रकल्पामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा भाग-१, सिंदखेडराजा भाग-२, नशिराबाद, अंचली, निमखेड, शिवणी टाका, पांगरखेड, वाघोरा, खामगाव, खापरखुटी, महारखेड, हनवतखेड, सावखेड तेजन, उगला, पिंपळखुटा, पिंपळगाव लेंडी यांसह इतर पात्र गावांचा समावेश व्हावा, या मागणीसाठी हा प्रश्न मी विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केला असून, शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या भागातील नागरिक, शेतकरी, युवक आणि उद्योजकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या गावांचाही नवनगर (स्मार्ट सिटी) प्रकल्पात समावेश होणे अत्यावश्यक आहे. याबाबत माझी ठाम भूमिका असून, संबंधित गावांचा प्रकल्पात समावेश होईपर्यंत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.
— मनोज कायंदे आमदार, सिंदखेडराजा मतदारसंघ

