Inauguration : बहुप्रतीक्षित मेहकर बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण रविवारी, दि. ७ जून रोजी दुपारी आयोजित समारंभात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री मकरंदआबा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर तसेच विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
मेहकर : बहुप्रतीक्षित मेहकर बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण रविवारी, दि. ७ जून रोजी दुपारी आयोजित समारंभात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री मकरंदआबा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर तसेच विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मेहकर येथील नव्या बसस्थानकासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांतून महायुती शासनाच्या माध्यमातून सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यात बसस्थानक इमारतीसाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपये तर परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान, कोरोना काळात बांधकाम प्रक्रियेला विलंब झाला होता. आता काम पूर्णत्वास आले असून ७ जून रोजी दुपारी ४ वाजता बसस्थानकाचे रीतसर लोकार्पण करण्यात येणार आहे. यापूर्वी तात्पुरत्या पत्र्याच्या बसस्थानकात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मूलभूत सुविधांचा अभाव, उन्हाळा व पावसाळ्यात होणारी गैरसोय यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती.
ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून मेहकर शहरात विविध विकासकामे मार्गी लागल्याचा दावा करण्यात येत आहे. यात विद्यार्थी अभ्यासिका, पंचायत समिती इमारत, पोलीस स्टेशन, वारकरी भवन, सांस्कृतिक संकुल तसेच मंदिर व उद्यान परिसरातील विकासकामांचा समावेश असून, शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

