Immediate resolution : जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे जिजाऊ सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी ‘पेंशन समाधान’ उपक्रम आणि ‘पेंशन अदालत’ उत्साहात पार पडली.

पेंशन समाधान उपक्रम व पेंशन अदालत उत्साहात संपन्न
अमरावती : जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे जिजाऊ सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी ‘पेंशन समाधान’ उपक्रम आणि ‘पेंशन अदालत’ उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोषागार अधिकारी अमोल इखे होते. महालेखापाल, नागपूर कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी मैथिली जगनाथन, सहाय्यक लेखाधिकारी अनुपमा भट्टाचार्य, लेखापाल सचिनकुमार तसेच वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांची उपस्थिती होती.
महालेखापाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचूक निवृत्तीवेतन प्रस्ताव कसे तयार करावेत, जेणेकरून निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना वेळेवर लाभ मिळू शकतील, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्तीवेतनविषयक प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यात आली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निवृत्तीवेतन वितरण जलद करण्यासाठी महालेखाकार कार्यालय, कोषागार कार्यालय आणि संबंधित आहरण-संवितरण अधिकारी यांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कनिष्ठ लेखापाल साजीया शमसू मोहम्मद यांनी प्रास्ताविक करताना विहीत कालावधीत निवृत्तीवेतन देण्यासाठी कोषागार कार्यालयाची भूमिका स्पष्ट केली तसेच उपक्रमाचे उद्दिष्ट सांगितले. सूत्रसंचालन कनिष्ठ लेखापाल श्रुतिका तडस यांनी केले.
निवृत्तीवेतनधारकांसाठी आयोजित पेंशन अदालत कार्यक्रमात डी. आर. देशमुख, जगदीश सायसिकमल, विरेंद्र दीक्षित आदी उपस्थित होते. वरिष्ठ लेखापाल राम जाधव यांनी प्रस्तावना मांडून विविध उपक्रमांची माहिती दिली. निवृत्तीवेतनधारकांना घरपोच सेवा देण्याच्या प्रयत्नांचीही माहिती यावेळी देण्यात आली. सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने जगदीश सायसिकमल यांनी संबंधित कार्यालयांच्या कार्याची प्रशंसा केली, तर विरेंद्र दीक्षित यांनी मांडलेली तक्रार महालेखाकार कार्यालयाच्या पथकाने तत्काळ निकाली काढली.
कार्यक्रमाच्या शेवटी कनिष्ठ लेखापाल राधिका निरंतर यांनी आभार मानले. श्रीमती जगनाथन यांनी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ लेखापाल सुबोध भगत, आदित्य सुरजूसे, लेखा लिपिक प्रणीत टिंगणे, सोनू राठोड आणि दीपक चव्हाण यांनी पुढाकार घेतला.

