Mahabreaking

[breaking_news]

Hundreds of trees felled: परवानगीशिवाय शेकडो झाडांची कत्तल? ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Hundreds of trees felled:  सिंनगाव जहाँगिर ते खल्याळ गव्हाण या सुमारे २० किलोमीटरच्या रस्त्यालगत असलेली १५ ते २० वर्षे जुनी हिरवीगार शासकीय झाडे वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता महावितरणचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तोडून लाकूड व्यापाऱ्यांना विकल्याचा गंभीर आरोप युवानेते योगेश मिसाळ यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, लाकूड व्यापारी तसेच संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

Hundreds of trees felled

  ‘हिरव्या संपत्तीचा सौदा कोणी केला?’ वृक्षतोड प्रकरणी योगेश मिसाळ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सिंनगाव जहाँगिर ते खल्याळ गव्हाण या सुमारे २० किलोमीटरच्या रस्त्यालगत असलेली १५ ते २० वर्षे जुनी हिरवीगार शासकीय झाडे वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता महावितरणचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तोडून लाकूड व्यापाऱ्यांना विकल्याचा गंभीर आरोप युवानेते योगेश मिसाळ यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, लाकूड व्यापारी तसेच संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

सिंनगाव जहाँगिर फाटा ते खल्याळ गव्हाण या मार्गाच्या दुतर्फा उभी असलेली पर्यावरणपूरक व डेरेदार झाडे अचानक तोडण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटल्या जात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण झाडेच मुळापासून तोडण्यात आल्याचा आरोप मिसाळ यांनी केला आहे.

वन विभागाची परवानगी, पंचनामा किंवा अधिकृत लिलाव न करता सुमारे २०० ते २५० झाडांची तोड करून त्याची विक्री लाकूड व्यापाऱ्यांना करण्यात आली असून यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असताना आणि लाकडाची वाहतूक सुरू असताना वन विभाग व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का, की तेही या प्रकारात सामील होते, असा थेट सवालही योगेश मिसाळ यांनी उपस्थित केला आहे.

रस्त्यालगतची ही झाडे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखत होती. उन्हाळ्यात प्रवाशांना सावली देणारी आणि नैसर्गिक संपत्ती मानली जाणारी ही झाडे एका झटक्यात नाहीशी झाल्याने पर्यावरणासह सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित महावितरण ठेकेदार, लाकूड व्यापारी तसेच संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा युवानेते योगेश मिसाळ यांनी दिला आहे.

मंत्र्यांशी थेट संपर्क

या कथित वृक्षतोडीमुळे सिंनगाव जहाँगिर ते खल्याळ गव्हाण परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणाची माहिती वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दूरध्वनीद्वारे दिल्याचा दावा केला आहे. या गंभीर आरोपांवर शासन व संबंधित विभाग कोणती कारवाई करतात, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top