Guru Purnima festival : गुरू हा मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारा असतो. अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे कार्य गुरूच करतात. जोपर्यंत मनुष्य ज्ञानप्राप्तीसाठी गुरूच्या चरणी नतमस्तक होत नाही, तोपर्यंत त्याला आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त केले.

अज्ञानातून ज्ञानाची प्राप्ती गुरूमुळेच होते : सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज
साखरखेर्डा : गुरू हा मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारा असतो. अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे कार्य गुरूच करतात. जोपर्यंत मनुष्य ज्ञानप्राप्तीसाठी गुरूच्या चरणी नतमस्तक होत नाही, तोपर्यंत त्याला आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त केले.यावेळी व्यासपीठावर ब्रह्मश्री १०८ वेदान्ताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, नागेश स्वामी तसेच माहेश्वरी समाजातील अनेक भाविक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज म्हणाले की, गुरू म्हणजे प्रकाश, गुरू म्हणजे ज्ञान. भारतीय संस्कृती ही गुरुपरंपरेचा गौरव करणारी संस्कृती आहे. गुरूची प्राप्ती झाली की, तेथूनच माणसाच्या आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात होते. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन करून ज्ञानपरंपरा अखंड ठेवली आणि गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व जगासमोर मांडले.
मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनीही गुरुतत्त्वाचे महत्त्व विशद केले. यावेळी महाराजांची फळतुला करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
मठाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच नीट (NEET) परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अप्पा लांबधाडे यांनी केले.
प.पू. श्री प्रल्हाद महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा महोत्सव
येथील प.पू. श्री प्रल्हाद महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी महापूजा, आरती आणि गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळपासूनच गावातील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनतळ व्यवस्थापनासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान या दोन्ही ठिकाणी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला.

