Mahabreaking

[breaking_news]

House-to-house enumeration :डोणगावात घरगणनेचा बोजवारा; इमारत क्रमांक टाकला, घरगणना क्रमांक विसरला!

House-to-house enumeration :देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना व घरगणनेच्या कामात डोणगाव आणि परिसरात मोठ्या त्रुटी आढळून आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक घरे व व्यावसायिक प्रतिष्ठानांवर केवळ ‘इमारत संख्या क्रमांक’ टाकण्यात आला असून, अत्यावश्यक असलेला ‘घरगणना क्रमांक’ मात्र टाकण्यात आलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

House-to-house enumeration

राष्ट्रीय कामात हलगर्जीपणा? डोणगावातील घरगणनेतील गंभीर त्रुटींमुळे नागरिक संतप्त

डोणगाव : देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना व घरगणनेच्या कामात डोणगाव आणि परिसरात मोठ्या त्रुटी आढळून आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक घरे व व्यावसायिक प्रतिष्ठानांवर केवळ ‘इमारत संख्या क्रमांक’ टाकण्यात आला असून, अत्यावश्यक असलेला ‘घरगणना क्रमांक’ मात्र टाकण्यात आलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगणनेचे काम सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी कामात निष्काळजीपणा झाल्याची चर्चा आहे. काही भागांमध्ये घरगणना क्रमांक न टाकताच काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे घरगणनेच्या कामात अप्रशिक्षित व्यक्तींकडून काम करून घेतल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

रहेमत नगर परिसरातील अनेक घरांवर केवळ इमारत क्रमांक टाकण्यात आला होता. मात्र घरगणना क्रमांक नसल्याची बाब जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती मेहकर येथील जनगणना विभागाला दिली. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाल केली आणि काही वेळातच त्या परिसरात घरगणना क्रमांक टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.

रहेमत नगरमधील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या असल्या तरी डोणगावच्या मुख्य बसस्थानक परिसरात अद्याप अनेक घरे व दुकानांवर घरगणना क्रमांक टाकण्यात आलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरगणनेचे काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात जनगणना कार्यात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका शिक्षकांशी संपर्क साधला असता, इमारत क्रमांकासोबत घरगणना क्रमांक टाकणे अनिवार्य असल्याचे त्यांनी मान्य केले. अशी त्रुटी होणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, कामातील हलगर्जीपणा किंवा खासगी व्यक्तींकडून काम करून घेतल्याच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

जनगणना व घरगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील काम मानले जाते. या कामात निष्काळजीपणा अथवा कामचुकारपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाईची तरतूद आहे. असे असतानाही काही ठिकाणी झालेल्या त्रुटींमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासनाने सखोल चौकशी करून डोणगाव परिसरातील घरगणनेच्या कामाची फेरतपासणी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी आणि उर्वरित काम अचूकपणे पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top