Horrific accident : देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात भरधाव वेगाने राँग साइडने येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारने स्विफ्ट कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना १० जुलै रोजी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने देऊळगाव राजा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भरधाव नेक्सॉनने स्विफ्टला जोरदार धडक; जखमींना सोडून चालक फरार, गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात भरधाव वेगाने राँग साइडने येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारने स्विफ्ट कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना १० जुलै रोजी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने देऊळगाव राजा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबरखेड येथील शेतकरी प्रदीप भगवान खार्डे (वय ३३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र ज्ञानेश्वर दिनकर वाघ (रा. डिग्रस, ता. देऊळगाव राजा) हे १० जुलै रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास एमएच-१५-डीसी-७४४७ क्रमांकाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने हॉटेल शिवनेरीकडे जात होते.
दरम्यान, देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात समोरून येणाऱ्या एमएच-२८-बीक्यू-९३५० क्रमांकाच्या टाटा नेक्सॉन कारच्या चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे राँग साइडने वाहन चालवत स्विफ्ट कारला समोरील बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत प्रदीप खार्डे आणि ज्ञानेश्वर वाघ हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी नेक्सॉन कारचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १३४ व १७७ अन्वये टाटा नेक्सॉन कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी गुन्हा नोंदविला असून, तेच या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

