Horrific accident : भरधाव फॉर्च्यूनरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने डॉक्टरसह त्यांची पत्नी ठार झाली तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरमध्ये मंगळवारी पहाटे घडली. मृतकांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा समावेश ओ तर त्यांची मुलगी, मुलगा आणि वाहनचालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना चॅनल क्रमांक 326.5 वर किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मुंबई कॉरिडॉरवर मृत्यूचा सापळा; छत्रपती संभाजी नगर येथील मृतक, तीन जण गंभीर जखमी
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : भरधाव फॉर्च्यूनरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने डॉक्टरसह त्यांची पत्नी ठार झाली तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरमध्ये मंगळवारी पहाटे घडली. मृतकांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा समावेश ओ तर त्यांची मुलगी, मुलगा आणि वाहनचालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना चॅनल क्रमांक 326.5 वर किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्यूनर कार (क्र. एमएच-20 एचएन-6768) नागपूरहून मुंबईकडे जात असताना समोरील ट्रक (क्र. एनएल-01 एडी-4981) ला पाठीमागून जोरदार धडकली. पहाटे सुमारे 6.27 वाजता नियंत्रण कक्षाकडून अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र सिंदखेडराजाचे पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

अपघातात कारमधील डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय 52) आणि त्यांच्या पत्नी गुलसितान बी सय्यद आसिफ (वय 45), दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर, यांचा गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. तर नबा सय्यद आसिफ (वय 18), सय्यद अजबमाज सय्यद आसिफ (वय 25) आणि कार चालक शेख साजिद शेख फरीद (वय 36) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जालना येथे हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकाचे चालक दिगंबर शिंदे व डॉ .मंगेश काळे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले.
ट्रक चालक मोहम्मद इजराऊल हक (रा. झारखंड) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो ट्रक घेऊन नागपूरहून मुंबईकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्यूनर कारने ट्रकला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गावरील मध्य लेनमध्ये उभी राहिल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अपघातग्रस्त वाहने हटवून दुसरबीड टोलनाक्यावर हलविली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा वेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृत दाम्पत्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

