Daily yoga practice : गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाभ्यास केला.

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; समर्थ फार्मसी महाविद्यालयात योगाभ्यासाचे आयोजन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाभ्यास केला.

यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, “रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. योगामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते. नियमित योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तींना उत्साह, मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. योग मनावरील ताण कमी करून चांगल्या झोपेसाठीही उपयुक्त ठरतो.”
डॉ. ताठे यांनी सांगितले की, संशोधनातून योगाच्या नियमित सरावामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते, स्नायू अधिक सक्षम होतात तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तणावमुक्त जीवनासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी योग हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी उपस्थितांना नियमित योगाभ्यासाचा संकल्प करण्याचे आवाहन करताना, “आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा”, “योग आपल्याला अशी ऊर्जा देतो जी हजारो तास काम करूनही मिळत नाही”, “योग म्हणजे मनातील चढ-उतार स्थिर करण्याची प्रक्रिया” असे प्रेरणादायी विचार मांडले. तसेच योगामुळे जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सिताफळे, डॉ. पी. आर. लड्डा, प्रा. किशोर चराटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई देवानंद कायंदे, सचिव सतीश कायंदे, सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृतीसाठी संस्थेत विविध मार्गदर्शनपर व उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

