Mahabreaking

[breaking_news]

Hit-and-Run Case Cracked:  ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणाचा पर्दाफाश, आरोपी जेरबंद!

Hit-and-Run Case Cracked: जालना रोड बायपास परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, देऊळगाव राजा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

Hit-and-Run

 अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महावितरणचा कंत्राटी कर्मचारी झाला होता ठार

गजानन तिडके

देऊळगाव राजा : जालना रोड बायपास परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, देऊळगाव राजा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

१२ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास निकेत सुरेश मिनासे (वय ४२, रा. देऊळगाव राजा) हे मोटारसायकलने (MH 28 AT 7356) जालना रोडवरून घरी येत होते. अजिंक्य वाईन बारजवळील परिसरात पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मिनासे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी हलविण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन मिंड व पथकाने तांत्रिक तपासाला गती दिली. १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाहनाचा मागोवा घेण्यात आला.

सखोल तपासानंतर राहुल पांडुरंग खार्डे (रा. चिखली, जि. बुलढाणा) याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले वाहन (MH 28 BB 3565) जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये पुढील कारवाई सुरू आहे. या यशस्वी तपासामुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top