Heatwave in Akola : गत काही दिवसांपासून अकोला शहराचे तापमान मोठ्या प्रमाणत वाढले आहे. हवामान विभागाने हिट वेव्हचा इशारा दिला असून प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रविवार २६ एप्रिल रोजी अकोल्यात तब्बल ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ज्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने २५ ते २७ एप्रिल दरम्यान हीट वेव्हचा इशारा दिला होता.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन : २७ एप्रिलपर्यंत हिट वेव्ह कायम राहणार
अकोला : गत काही दिवसांपासून अकोला शहराचे तापमान मोठ्या प्रमाणत वाढले आहे. हवामान विभागाने हिट वेव्हचा इशारा दिला असून प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रविवार २६ एप्रिल रोजी अकोल्यात तब्बल ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ज्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने २५ ते २७ एप्रिल दरम्यान हीट वेव्हचा इशारा दिला होता.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अकोला शहराचे सध्या तापमान ४४ ते ४५ अंशांच्या दरम्यान स्थिर असले तरी रविवारी नोंदवलेले ४६.९ अंश तापमान हे यंदाच्या एप्रिलमधील विक्रमी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे, अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर जाण्याचे तसेच जड शारीरिक कामे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस तापमानात दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
उष्माघाताची अशी आहेत लक्षणे
वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि सतत घाम येणे अशी लक्षणे दिसत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून बाधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू आहेत.
लहान मुलांसह पाळीव प्राण्यांची काळजी घ्या
प्रशासनाने लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद किंवा उभ्या वाहनांमध्ये अजिबात ठेवू नये, असा इशारा दिला आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून तहान लागो किंवा न लागो, नियमित पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच थंडावा देणाऱ्या पेयांचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी सुचवले उपाय
दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे.
अत्यावश्यक असल्यासच बाहेर जावे.
जड कामे टाळावीत, वाहनांचा वापर मर्यादित ठेवावा.
भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
इतिहासातील तापमानाच्या विक्रमाकडे वाटचाल
यापूर्वी अकोल्यात २२ मे १९४७ रोजी येथे ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली होती.
१ जून १९२३ रोजी जून महिन्यात ४७.२ अंश तापमान नोंदवले गेले होते.
अलीकडेच मे २०२० मध्ये ४७.४ अंश तापमानामुळे अकोला देशातील दुसरे सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते.
एप्रिल २०२६ मध्येही ४४.२ अंश तापमानासह अकोल्याचा जागतिक उष्ण शहरांमध्ये समावेश झाला होता.
रविवार २६ एप्रिल रोजी ४६.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

