Nitin Deshmukh : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी, यासाठी पश्चिम विदर्भात आंदोलन उभारल्याचा धसका घेत भाजपच्या एका स्थानिक आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून बाळापूर विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी मंजूर झालेला १० कोटी रुपयांचा निधी रद्द केल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची राजकीय किंमत आता विकासकामांचा निधी रोखून वसूल केली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुधवारी (४ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.

३३४ बळी, ८५१ अपघात तरी रस्त्यांचा निधी रद्द! बाळापूरच्या विकास निधीवरून नितीन देशमुख आक्रमक; मंत्रालयात आंदोलनाचा इशारा
अकोला : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी, यासाठी पश्चिम विदर्भात आंदोलन उभारल्याचा धसका घेत भाजपच्या एका स्थानिक आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून बाळापूर विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी मंजूर झालेला १० कोटी रुपयांचा निधी रद्द केल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची राजकीय किंमत आता विकासकामांचा निधी रोखून वसूल केली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुधवारी (४ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मागील सात वर्षांत तब्बल ८५१ अपघात घडल्याची अधिकृत आकडेवारी आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. या अपघातांमध्ये ३३४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, ११० जण गंभीर जखमी झाले आहेत.
मतदारसंघातील रस्त्यांची ही भयावह परिस्थिती लक्षात घेऊन आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि नूतनीकरणासाठी किमान १५० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असता, मुख्यमंत्र्यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, गत आठवड्यात हा निधी अन्य जिल्ह्यातील कामांकडे वळविण्यात आला असून, बाळापूर मतदारसंघातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर निधी रद्द करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत त्यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे स्पष्ट केले.
स्वीय सहाय्यकाला हाताशी धरून राजकीय कारस्थान?
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांना हाताशी धरून जिल्ह्यात स्वतःला विकासमहर्षी म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या एका आमदाराने बाळापूर मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीचा मंजूर निधी रद्द करण्यासाठी कारस्थान केल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला. भाजपने उमेदवारी दिली नाही तर पक्षाची उमेदवारी बाजूला सारून या नेत्याने विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी. जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
…तर बांधकाम मंत्र्यांच्या दालनात सरपंचांसह आंदोलन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील काही आमदारांकडून विदर्भात बदनाम केले जात असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांच्या निधीचा प्रश्न बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मार्गी न लावल्यास मतदारसंघातील सरपंचांना सोबत घेऊन मंत्रालयात त्यांच्या दालनात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे रस्ते विकास निधीचा प्रश्न आता राजकीय संघर्षाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.
या तीन रस्त्यांचा १० कोटींचा निधी रद्द
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील खालील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी रद्द झाल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
- मनसगाव – निंबा – निमकर्डा : ४ कोटी रुपये.
- माझोड – आलेगाव : ३ कोटी ५० लाख रुपये.
- दिग्रस – देऊळगाव – घाटबोरी : २ कोटी ५० लाख रुपये.
अशा प्रकारे एकूण १० कोटी रुपयांचा निधी रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार, शहरप्रमुख आशिष गावंडे, अकोला पूर्वचे शहरप्रमुख राहुल कराळे, जिल्हासंघटक भूषण भिरड, तालुकाप्रमुख संजय भांबेरे आदी उपस्थित होते.

