Gang Circulating : पेट्रोल पंपावर डिझेलचे पैसे देताना वापरण्यात आलेल्या बनावट नोटांमुळे उघडकीस आलेल्या प्रकरणात मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे बनावट चलन वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

अमानी पेट्रोल पंपावर संशय आल्याने भांडाफोड; सात जण जेरबंद
मालेगाव : पेट्रोल पंपावर डिझेलचे पैसे देताना वापरण्यात आलेल्या बनावट नोटांमुळे उघडकीस आलेल्या प्रकरणात मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे बनावट चलन वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर आंध्र प्रदेश क्रमांकाची इनोव्हा कार (ए.पी. ०७ ए.सी. ४५५४) डिझेल भरण्यासाठी आली होती. वाहनचालकाने सुमारे दोन हजार रुपयांचे डिझेल भरल्यानंतर पैसे देताना एक हजार रुपयांच्या खऱ्या नोटांसोबत ५०० रुपयांच्या दोन नोटा दिल्या. मात्र, त्या नोटांवर ‘भारतीय बच्चो का बैंक’ आणि ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नमूद असल्याचे पंप कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.
नोटांबाबत संशय निर्माण झाल्याने पंप कर्मचारी माधव केशव काटेकर यांनी तत्काळ वाहन थांबविण्यास सांगितले आणि याची माहिती पंप मालक विकास गवळी यांना दिली. त्यानंतर वाहन अडवून पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच मालेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंप मालक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी कारमधील सातही जणांना ताब्यात घेत वाहनासह मालेगाव पोलिस ठाण्यात आणले.
याप्रकरणी पंप कर्मचारी माधव केशव काटेकर (वय ६१, रा. मालेगाव) यांच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १७९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार करीत आहेत.
सतर्क कर्मचाऱ्यामुळे उघडकीस आला प्रकार
अमानी येथील पेट्रोल पंपावर डिझेलचे पैसे देताना आरोपींनी ५०० रुपयांच्या दोन बनावट नोटा दिल्या. नोटांवर ‘भारतीय बच्चो का बैंक’ व ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे लिहिलेले असल्याचे पंप कर्मचारी माधव काटेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून पंप मालकाला माहिती दिली व पोलिसांना कळविले. कर्मचाऱ्याच्या या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा बाळगणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
कारमधून ४,७०० बनावट नोटा जप्त
पोलिसांनी इनोव्हा कारची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या तब्बल ४ हजार ७०० बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांची एकूण किंमत २३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चो का बैंक’ व ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी सात आरोपींना अटक करून कारसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

