Fluctuating weather :गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचा अनियमितपणा वाढला असून, कधी संततधार तर कधी कडक ऊन अशा बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वातावरणातील वाढती आर्द्रता आणि त्यानंतर पडणारे कडक ऊन यामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मळमळ, अतिसार तसेच चिकनगुनियासदृश तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरही याचा ताण वाढत असून, शासकीय आरोग्य केंद्रांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.

ताप, खोकला, डायरियासह चिकनगुनियासदृश रुग्ण वाढले; सरकारीसह खासगी रुग्णालयांत गर्दी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचा अनियमितपणा वाढला असून, कधी संततधार तर कधी कडक ऊन अशा बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वातावरणातील वाढती आर्द्रता आणि त्यानंतर पडणारे कडक ऊन यामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मळमळ, अतिसार तसेच चिकनगुनियासदृश तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरही याचा ताण वाढत असून, शासकीय आरोग्य केंद्रांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात यंदा सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाला. मात्र, गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काही वेळ पाऊस तर लगेच कडक ऊन, अशा वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच ग्रामीण भागातील वस्त्यांच्या आसपास साचलेले पाणी, झाडाझुडपांमध्ये वाढलेली अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अपेक्षित प्रमाणात सक्रिय नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांना स्वच्छता, डासांची उत्पत्ती रोखणे, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे आणि आजारांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात ही जनजागृती कितपत होत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
आरोग्यावर लाखो रुपये खर्च; सेवा मात्र अपुरी?
केंद्र व राज्य शासनाकडून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असला, तरी ग्रामीण भागातील नागरिकांना अपेक्षित आरोग्य सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे. तालुका व जिल्हास्तरावर आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे अहवाल सादर केले जात असले तरी प्रत्यक्ष ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरोग्य सेवक व सेविकांनी नियमित गृहभेटी देऊन कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची माहिती घेणे, परिसरातील स्वच्छता तपासणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनांची माहिती देणे तसेच शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती नागरिकांना देणे अपेक्षित आहे. या कामांमध्ये अधिक सक्रियता आणण्याची गरज आहे.
नागरिकांनीही घ्यावी खबरदारी
पावसाळ्यात नागरिकांनी घर आणि परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराजवळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याची डबकी बुजवावीत, भंगार साहित्याची वेळेवर विल्हेवाट लावावी, पाण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करून कोरडी ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
घराशेजारील भंगार साहित्य, कुंड्या, फ्रिजच्या मागील बाजूस असलेली पाण्याची ट्रे, पाण्याच्या टाक्या आणि इतर ठिकाणी साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कोणताही आजार अंगावर न काढता लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शासकीय रुग्णालयांच्या ओपीडीवर वाढता ताण
तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे उपलब्ध माहितीतून दिसून येते. ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे सध्या दररोज सुमारे ३५० ते ४०० रुग्णांची ओपीडी होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळखेड अंतर्गत सुमारे १५ ते २० गावे जोडलेली असून, येथे दररोज साधारण ४० ते ५० रुग्णांची ओपीडी होत असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव मही येथेही रुग्णसंख्येत वाढ झाली असून, दररोज सुमारे १५० ते १७० रुग्णांची ओपीडी होत आहे.
तर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, अंढेरा येथे दररोज सुमारे १०० ते ११० रुग्णांची ओपीडी होत आहे. याशिवाय तालुक्यात एकूण १४ आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. या उपकेंद्रांमधून नागरिकांना प्रभावी सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाची जबाबदारी
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सदानंद बनसोड म्हणाले, “सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून ग्रामीण भागातील नियुक्त आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवकांना दैनंदिन कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये गृहभेटी देणे, आजारांची माहिती घेणे, वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही रुग्णाने आजार अंगावर न काढता लक्षणे दिसताच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावेत.”

