Balapur reverberates: वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न तसेच कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), आयटक आणि किसान सभेच्या वतीने बाळापुरात ‘बदलाव जरुरी है’ जनजागरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘महागाई कमी करा, बेरोजगारी संपवा’; बाळापुरात भाकपच्या आंदोलनातून सरकारविरोधात जोरदार निदर्शने
बाळापूर : वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न तसेच कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), आयटक आणि किसान सभेच्या वतीने बाळापुरात ‘बदलाव जरुरी है’ जनजागरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बुद्ध विहार बसस्थानक येथून जनजागरण यात्रा काढण्यात आली. त्यानंतर जुनी चवळी येथील विठ्ठल सभागृहात सभा घेण्यात आली. या सभेत कॉ. धम्मा खडसे यांचा शाहिरी जलसा झाला. कॉ. नयन गायकवाड, कॉ. महानंदा ढोक आणि कॉ. सुनंदा पद्मने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर दुपारी ३ वाजता खोलेश्वर संस्थान येथून तहसील कार्यालयापर्यंत जनजागरण यात्रा काढण्यात आली. हातात लाल बावटे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगार, शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘महागाई कमी करा’, ‘बेरोजगारी संपवा’, ‘चारही लेबर कोड रद्द करा’, ‘कामगारांच्या मागण्या मान्य करा’, ‘शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभाव द्या’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अंगणवाडी, आशा व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. कायमस्वरूपी नियुक्ती होईपर्यंत किमान २६ हजार रुपये वेतन, तसेच ९ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, पत्रकारांच्या मागण्या तसेच कामगार-कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
चारही कामगार कायद्यांच्या संहिता रद्द कराव्यात, महागाईला आळा घालावा, दर्जेदार सरकारी शिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि बेरोजगारी संपवावी, अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
देशभर सुरू असलेल्या जनजागरण अभियानाचा हा एक भाग असून, १ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
या जनजागरण यात्रेत कॉ. नयन गायकवाड, कॉ. धम्मा खडसे, कॉ. पारस आगरकर, कॉ. महानंदा ढोक, कॉ. सुनंदा पद्मने, बाळापूर अंगणवाडी युनियनच्या अध्यक्षा कॉ. सुनंदा पद्मने, कॉ. शकुंतला वानखडे, कॉ. नंदा आखरे, कॉ. रेखा विरोकार, कॉ. ज्योती टेमधरे, कॉ. सुनंदा राऊत, कॉ. विजया परघरमोर, कॉ. कल्पना कान्हेरकर, कॉ. वैजू कानेरकर, कॉ. अनिता शिरसाट, कॉ. शारदा निंबोकर, कॉ. शालिनी दांदडे, कॉ. अनिता अवचार, कॉ. शह गुप्ता जहागीरदार आणि कॉ. रत्ना तायडे यांच्यासह आयटक, किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

