9 Seriously Injured :येथे व्हॉट्सअॅपवरील एका पोस्टवरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट तुंबळ हाणामारीत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही गटांतील एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, एवढी गंभीर घटना घडूनही अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

दुसरबीड : येथे व्हॉट्सअॅपवरील एका पोस्टवरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट तुंबळ हाणामारीत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही गटांतील एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, एवढी गंभीर घटना घडूनही अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी दुपारी दोन तरुणांमध्ये व्हॉट्सअॅपवर टाकलेल्या पोस्टवरून वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच उग्र बनला. एका गटाने दुसऱ्या गटातील व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर साथीदारांना बोलावण्यात आले आणि पाहता पाहता हा वाद हिंसक संघर्षात बदलला.
या हाणामारीत लाठ्या, काठ्या आणि दगडांचा वापर करण्यात आला. माजी तंटामुक्ती अध्यक्षांच्या घराजवळ हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत नौशाद शेख, जिलानी शेख, इमरान शेख, नसीर शेख, तनवीर शेख तसेच दुसऱ्या गटातील जुनेद, जाकीर, अफसर आणि वसीम हे गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये जखमींच्या डोक्यावर व हात-पायांवर गंभीर मार झाल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संदर्भात ठाणेदार संजय मातोडकर यांनी सांगितले की, “अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र पोलिसांचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून पुढील कारवाई केली जाईल.” दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून एका गटाचा दावा हा वाद अचानक घडल्याचा आहे, तर दुसऱ्या गटाने हा हल्ला नियोजित असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

