Fields lie desolate : यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने अजूनही उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याचे चित्र असून, तालुक्यातील सुमारे ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; पावसाअभावी शेतकरी चिंतेत
बबन इंगळे
बार्शीटाकळी : यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने अजूनही उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याचे चित्र असून, तालुक्यातील सुमारे ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद यांसारख्या प्रमुख खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे पूर्ण करून शेतजमीन तयार ठेवली आहे. अनेकांनी महागडे बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करून ठेवले आहे. मात्र आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
हवामान तज्ज्ञांनी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसात अनियमितता राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्याची प्रचिती खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच येऊ लागल्याचे दिसत आहे. पावसाचा आणखी विलंब झाल्यास नियोजित पिकांच्या पेरणीत बदल करावा लागू शकतो. याचा थेट परिणाम उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी पावसाच्या अपेक्षेवर मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली होती. परंतु लागवडीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने ही कपाशी आता धोक्यात आली आहे. पंधरा दिवसांत पाऊस पडेल, या विश्वासावर केलेली लागवड कोमेजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
हळद उत्पादक सर्वाधिक अडचणीत
बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव, सायखेड, जामवसु, धाबा, लोहगड, पूनोती आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकपद्धती सोडून हळद लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. मसाला पीक म्हणून हळदीला चांगला बाजारभाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात लागवड वाढली आहे. मात्र यंदा पावसाच्या विलंबामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.हळदीची लागवड जून महिन्याच्या प्रारंभी पूर्ण होणे आवश्यक असते. परंतु अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने लागवड लांबणीवर पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी महागडे हळदीचे बेणे खरेदी करून साठवून ठेवले आहे. पाऊस आणखी लांबल्यास बेणे खराब होण्याची तसेच आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकीकडे शेतजमिनी पेरणीसाठी सज्ज आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागून आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास बार्शीटाकळी तालुक्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

