FDA cracks down : प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मलकापूर शहरात धडक कारवाई केली आहे. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर पदार्थांचा एकूण ६४ हजार ३३२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन व्यावसायिकांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लखानी चौक ते चारखंबा चौक; FDAची धडक कारवाई, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
बुलढाणा : प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मलकापूर शहरात धडक कारवाई केली आहे. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर पदार्थांचा एकूण ६४ हजार ३३२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन व्यावसायिकांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लखानी चौकात ११ हजारांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पहिली कारवाई मलकापूर शहरातील लखानी चौक परिसरात केली. या कारवाईत ११ हजार ९०५ रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आशिष चंपालाल मालपाणी यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८७५/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
चारखंबा चौकातील पान मंदिरावरही कारवाई
दुसरी कारवाई चारखंबा चौकातील मे. गजानन पान मंदिर येथे करण्यात आली. या ठिकाणाहून ५२ हजार ४२७ रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गजानन सुभाष भोईटे यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८७६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये मिळून ६४ हजार ३३२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
मोक्काच्या कारवाईचाही उल्लेख
या प्रकरणातील तपासादरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईसाठी आवश्यक आधार आढळल्यास त्याबाबत विचार करण्यात यावा, असा उल्लेख संबंधित फिर्यादींमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सह आयुक्त (अन्न), अमरावती विभागाचे स. द. केदारे आणि सहायक आयुक्त (अन्न), बुलढाणा येथील पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे आणि जी. के. वसावे यांनी अनुक्रमे दोन्ही ठिकाणी कारवाई केली.
प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे मलकापूर शहरातील अशा पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

