Mahabreaking

[breaking_news]

the relationships :हसत्या-खेळत्या दोन संसारांत प्रेमप्रकरणाची ठिणगी; पोलिसांच्या समुपदेशनाने पुन्हा जुळले नातेसंबंध!

the relationships : एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे उच्चशिक्षित पती-पत्नी, दोन गोंडस मुले आणि सुखी कुटुंब… समाजात आदर्श कुटुंब म्हणून ओळख निर्माण झालेल्या या संसारात अचानक तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि हसत्या-खेळत्या कुटुंबाला ग्रहण लागले. पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे केवळ एका नव्हे, तर दोन कुटुंबांतील शांतता भंग पावली. पती-पत्नीतील विश्वासाला तडा गेला, मुलांचे भावविश्वही अस्थिर झाले आणि दोन्ही कुटुंबे विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, पोलिसांच्या समुपदेशनामुळे आणि कुटुंबीयांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे दोन्ही संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.

the relationships

विवाहित पतीच्या आयुष्यात प्रेयसीची एंट्री; दोन कुटुंबे आली विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर

नागपूर : एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे उच्चशिक्षित पती-पत्नी, दोन गोंडस मुले आणि सुखी कुटुंब… समाजात आदर्श कुटुंब म्हणून ओळख निर्माण झालेल्या या संसारात अचानक तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि हसत्या-खेळत्या कुटुंबाला ग्रहण लागले. पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे केवळ एका नव्हे, तर दोन कुटुंबांतील शांतता भंग पावली. पती-पत्नीतील विश्वासाला तडा गेला, मुलांचे भावविश्वही अस्थिर झाले आणि दोन्ही कुटुंबे विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, पोलिसांच्या समुपदेशनामुळे आणि कुटुंबीयांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे दोन्ही संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.

उच्चशिक्षित जोडपे, सुखी संसार अन् दोन मुले

विजय आणि दीपाली (दोघांचीही नावे काल्पनिक) हे उच्चशिक्षित दाम्पत्य. विजय एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ विभागप्रमुख पदावर कार्यरत आहे, तर एमबीए पदवीधर दीपाली एका कंपनीत मानव संसाधन व्यवस्थापक (एचआर मॅनेजर) म्हणून काम करते. दोघेही नातेवाईक असल्याने कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला होता.

काही वर्षांतच त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगा आणि एका मुलीचे आगमन झाले. दोघेही नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आनंदाने संसार करीत होते. मुले आजी-आजोबांकडे राहत असल्याने पती-पत्नीला नोकरीच्या जबाबदाऱ्याही सांभाळता येत होत्या. कुटुंबीयांच्या नजरेत हे एक आदर्श आणि आनंदी कुटुंब होते.

विजयला समाजकार्याचीही आवड होती. सार्वजनिक सण-उत्सव आणि सामाजिक उपक्रमांमध्ये तो सक्रिय सहभाग घेत असे. त्यामुळे त्याचा मित्रपरिवार आणि परिचय वाढत गेला. मात्र, याच सामाजिक संपर्कातून त्याच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीचा प्रवेश झाला आणि सुखी संसारात वादळ निर्माण झाले.

मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात

विजय राहत असलेल्या सोसायटीतच रिया (काल्पनिक नाव) ही विवाहित तरुणी वास्तव्यास होती. विजयच्या स्वभावामुळे दोघांची ओळख झाली. रियाने त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून संवाद सुरू केला. सुरुवातीला मैत्रीच्या स्वरूपात असलेला हा संवाद हळूहळू वाढत गेला. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

या संबंधांचा परिणाम विजयच्या कौटुंबिक जीवनावर होऊ लागला. त्याच्या वागण्यात बदल झाला. पत्नी आणि मुलांना देण्याचा वेळ कमी होऊन रियासोबत भेटीगाठी आणि बाहेर फिरण्यात त्याचा अधिक वेळ जाऊ लागला. परिणामी, पती-पत्नीतील संवाद कमी झाला आणि कौटुंबिक तणाव वाढू लागला.

दोन कुटुंबांतील विश्वासाला तडा

विजय आणि रिया यांच्या प्रेमसंबंधांची माहिती दीपालीला मिळाली. दुसरीकडे, रियाच्या पतीलाही विजयसोबतचे काही फोटो मिळाले. मात्र, सुरुवातीला दोघेही आपले संबंध मान्य करण्यास तयार नव्हते. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये संशय, अविश्वास आणि वादाचे वातावरण निर्माण झाले.

कौटुंबिक कलह वाढत गेल्याने रिया आपल्या दोन मुलांना मागे ठेवून माहेरी निघून गेली. तर दीपालीही पतीपासून वेगळी राहू लागली. एका विवाहबाह्य संबंधामुळे दोन कुटुंबांतील शांतता भंग पावली. या वादाचा सर्वाधिक परिणाम दोन्ही कुटुंबांतील मुलांच्या भावविश्वावर होण्याची शक्यता निर्माण झाली.

दोन वर्षांच्या वादानंतर प्रकरण पोलिसांत

जवळपास दोन वर्षे हा कौटुंबिक वाद सुरू होता. अखेर विजय आणि रियाच्या पतीमध्ये वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये मारहाण झाल्याने प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्याने केवळ तक्रारीपुरता विचार न करता दोन्ही कुटुंबांचे भविष्य आणि मुलांच्या हिताचा विचार केला. दोन्ही कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून संपूर्ण परिस्थिती समजून घेतली. रिया आणि दीपाली यांचे समुपदेशन करण्यात आले. विजयने आपल्या पत्नीची माफी मागितली, तर रियाच्या पतीनेही सामंजस्याची भूमिका घेतली.

समुपदेशनाने वाचले दोन संसार

पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही कुटुंबांमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू झाली. परस्परांना समजून घेण्याची आणि झालेल्या चुका सुधारण्याची तयारी दाखवण्यात आली. परिणामी, विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या दोन्ही कुटुंबांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली.

या घटनेतून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश समोर येतो. विवाह केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून त्याच्याशी दोन कुटुंबांचे आणि मुलांच्या भविष्याचे भावविश्व जोडलेले असते. नात्यांमधील विश्वास, संवाद आणि जबाबदारी यांना तडा गेल्यास त्याचे परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होतात. अशा वेळी वेळीच संवाद, समुपदेशन आणि सामंजस्याची भूमिका घेतल्यास अनेक कुटुंबे विस्कटण्यापासून वाचू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top