Farmers : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अग्रिम अनुदान वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी सामूहिक खातेदार शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रे भरून संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे तातडीने जमा करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. दुष्काळ अग्रिम अनुदानांतर्गत पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन ॲक्शन मोडवर; दुष्काळ अनुदान, ॲग्रीस्टॅक व विहीर परवानगीचा घेतला आढावा
गजानन तिडके
सिंदखेड राजा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अग्रिम अनुदान वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी सामूहिक खातेदार शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रे भरून संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे तातडीने जमा करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. दुष्काळ अग्रिम अनुदानांतर्गत पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंदखेड राजा उपविभागातील प्रशासकीय कामकाज, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळ अग्रिम अनुदान, ॲग्रीस्टॅक नोंदणी, नवीन विहीर खोदकाम परवानगी, पाणीटंचाई, चाराटंचाई, महसूल विभागातील प्रलंबित कामे आणि विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सामूहिक खातेदारांनी संमतीपत्रे जमा करण्याचे आवाहन
दुष्काळ अग्रिम अनुदानाच्या प्रक्रियेत सामूहिक खातेदार असलेल्या शेतकऱ्यांची संमतीपत्रे प्रलंबित असल्यास अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रे भरून आपल्या गावातील तलाठ्यांकडे तातडीने जमा करावीत, असे प्रा. खडसे यांनी स्पष्ट केले. पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी महसूल यंत्रणेनेही आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश
ॲग्रीस्टॅक (AGRISTACK) योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे असल्याने कृषी व महसूल विभागाने याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असेही बैठकीत सूचित करण्यात आले.
नवीन विहिरींच्या परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
उपविभागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवीन विहीर खोदकाम परवानगीच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. नवीन विहीर खोदण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालयात आवश्यक अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जांवर तातडीने अहवाल मागवून पुढील कार्यवाहीसाठी ते उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असे स्पष्ट निर्देश प्रा. संजय खडसे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले.
महसूल व विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना
बैठकीत महसूल व विकासकामांचा आढावा घेताना सामूहिक खातेदारांच्या अडचणी, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय समस्या आणि स्थानिक स्तरावरील विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. कोणतेही काम अनावश्यकपणे प्रलंबित राहू नये, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कामकाज करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने व वेळेत मिळणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने आणि निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.
महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित
या बैठकीस सिंदखेड राजा येथील प्रभारी तहसीलदार प्रवीण वऱ्हाडे, देऊळगाव राजा तहसीलदार प्रमोद खामाट, सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, देऊळगाव राजा तालुका कृषी अधिकारी भगवान कछवे यांच्यासह उपविभागातील सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

