Jaltara: वाढत्या दुष्काळी परिस्थितीवर मात करून भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी पावसाचे पाणी शेतात जिरवून भूजलपातळी वाढविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या संकल्पनेतून बीबी येथे जलतारा अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना जलसंधारणाबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच प्रत्यक्ष शेतात शोषखड्डा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांचा पुढाकार; शेतकऱ्यांना मोफत जेसीबीचे आश्वासन
रमेश खंडागळे
बीबी : वाढत्या दुष्काळी परिस्थितीवर मात करून भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी पावसाचे पाणी शेतात जिरवून भूजलपातळी वाढविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या संकल्पनेतून बीबी येथे जलतारा अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना जलसंधारणाबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच प्रत्यक्ष शेतात शोषखड्डा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
बीबी येथील आनंद मंगल कार्यालयात आयोजित या कार्यशाळेला जलतारा अभियानाचे संस्थापक व संशोधक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत जिरविण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. यासाठी शेतात ठरावीक अंतरावर पाच बाय पाच फूट आकाराचे आणि सहा फूट खोल शोषखड्डे खोदून त्यामध्ये दगड किंवा विहिरीतील पाषाण भरावेत, अशी माहिती त्यांनी दिली. या पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढू शकते. परिणामी, विहिरी आणि इतर जलस्रोतांना फायदा होऊन सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेनंतर धनंजय कायंदे यांच्या शेतात शोषखड्डा तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रात्यक्षिकासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्याचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजना प्रत्यक्ष शेतात राबवून पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
शेतकऱ्यांना मदतीचे आमदार कायंदे यांचे आश्वासन
जलतारा अभियानाचा शिवारातील तसेच मतदारसंघातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार मनोज कायंदे यांनी दिले. शासकीय योजनेच्या निकषांत बसत नसलेल्या शेतकऱ्यांनाही शोषखड्डे खोदण्यासाठी मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जलतारा शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नदी-नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण तसेच शासकीय इमारतींवर पावसाचे पाणी साठविण्याची आणि जमिनीत जिरविण्याची व्यवस्था (रेन वॉटर हार्वेस्टिंग) उभारण्यासाठी पात्र नागरिक व शेतकऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींकडे अर्ज करावेत, असे आवाहन लोणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्या वतीने विस्तार अधिकारी गजानन कावरखे व ज्ञानेश्वर चनखोरे यांनी केले.
या कार्यशाळेला परिसरातील मान्यवर, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल विभाग, वनविभाग, महावितरण तसेच अंगणवाडी सेविकांसह विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अरविंद चव्हाण यांनी केले.

