Mahabreaking

[breaking_news]

Dongaon water supply scheme :पाच दिवस पाणीपुरवठा चालवून दाखवा, मगच बिल द्या! डोणगावच्या नळयोजनेवर आंदोलकांची ठाम भूमिका 

Dongaon water supply scheme : डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजावरून निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मेहकर पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. कंत्राटदाराने पाच दिवस प्रत्यक्ष पाणीपुरवठा करून योजना सुरळीत सुरू असल्याचे सिद्ध करावे आणि त्यानंतरच संबंधित देयक अदा करावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, डोणगावमधील नागरिकांना प्रत्यक्षात या योजनेतून पाणी मिळाले नसल्याचा आरोप करीत संपूर्ण योजनेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने ८ ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली.

Dongaon

कागदावर नळयोजना सुरू, प्रत्यक्षात ग्रामस्थ तहानलेले! डोणगावच्या पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीची मागणी

डोणगाव  : डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजावरून निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मेहकर पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. कंत्राटदाराने पाच दिवस प्रत्यक्ष पाणीपुरवठा करून योजना सुरळीत सुरू असल्याचे सिद्ध करावे आणि त्यानंतरच संबंधित देयक अदा करावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, डोणगावमधील नागरिकांना प्रत्यक्षात या योजनेतून पाणी मिळाले नसल्याचा आरोप करीत संपूर्ण योजनेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने ८ ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली.

पंचायत समितीत १३ गावांतील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात बेमुदत साखळी धरणे आंदोलनकर्ते प्रशांत पाटील (जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजितदादा पवार गट) व अन्य प्रतिनिधींच्या उपस्थितीत लोणी गवळीसह १३ गावांमधील जल जीवन मिशन आणि नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत प्रामुख्याने डोणगाव येथील पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा झाली. संबंधित राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून, सन २०२१-२२ मध्ये १४ महिने पाणीपुरवठा केल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये असल्याचे कंत्राटदार आकाश सास्ते यांनी सांगितले.

योजना सुरू करण्यासाठी अनेक अडचणी

डोणगावची पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस आणि जलशुद्धीकरण केंद्र येथे वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर पंपिंग मशिनरी व इतर उपकरणांची दुरुस्ती, पुढील एक महिना योजना चालविण्यासाठी लागणाऱ्या वीजबिलाचा भरणा आणि जलशुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा पुरवठा कोण करणार, याबाबत निश्चित निर्णय घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

कंत्राटदार सास्ते यांनी मंजूर अंदाजपत्रकानुसार काम केल्याचे सांगितले. तसेच गावातील अंतर्गत वितरण वाहिनीला मंजुरी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे योजनेच्या प्रत्यक्ष कार्यान्वयनासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.

पाच दिवस पाणीपुरवठा करून दाखवा; आंदोलकांची मागणी

बैठकीत आंदोलकांनी स्पष्ट भूमिका मांडली. केवळ कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे सांगून देयक अदा करू नये. कंत्राटदाराने आधी पाच दिवस सलग पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे चालवून दाखवावी. गावातील नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळत असल्याची खात्री झाल्यानंतरच संबंधित देयक अदा करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

डोणगावमधील नागरिकांना या नळयोजनेतून प्रत्यक्षात पाणी मिळालेच नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत आणि कंत्राटदार यांनी निधी खर्च करून कागदोपत्री योजना सुरू असल्याचे दाखविले आणि निधीचा गैरवापर झाल्याचा संशय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

डोणगावच्या नळ पाणीपुरवठा योजनेवर झालेला खर्च, कामाची प्रत्यक्ष स्थिती, ग्रामपंचायतीच्या नोंदी आणि पाणीपुरवठा झाल्याच्या दाव्यांची पडताळणी करण्यात यावी. योजनेसाठी मंजूर निधीचा विनियोग नियमानुसार झाला आहे का, याची चौकशी करावी. तसेच ग्रामस्थांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

योजनेच्या कामाबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि निधीच्या वापराबाबतचे आरोप लक्षात घेता, संबंधित विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता

या आढावा बैठकीला आंदोलनकर्ते प्रशांत पाटील यांच्यासह रामदास इरतकर, साहेबराव खंडारे, अशोक वानखेडे, विठोबा नरवाडे, सदर चंद्रे, संतोष पाटील, आनंदराव भालेराव उपस्थित होते. तसेच कंत्राटदार आकाश सास्ते, पंजाब किसन धांडे, धनंजय हुंबाड, निलेश खोकले, विशाल तांगडे, मुकेश देशमुख, प्रमोद काळे, कडुभाऊ वैराळ (सरपंच, ग्रामपंचायत वरदडी वैराळ), आर. जी. धाबे (उपविभागीय अभियंता, ग्रापापु), श्री. मंटागळे (विस्तार अधिकारी, कृषी) आणि कनिष्ठ अभियंता श्री. स्वामी यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने ८ ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली. मात्र, डोणगावच्या नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणे, योजनेची स्थिती स्पष्ट होणे आणि निधीच्या वापराबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती कार्यवाही करते आणि डोणगावकरांची पाणीटंचाई कधी दूर होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top