Eligible voters names missing : भारत निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रणालीतील कथित तांत्रिक अडचणींमुळे पातूर शहरातील अनेक पात्र मतदारांची नावे ऑनलाईन मतदार यादीत दिसत नसल्याने त्यांना SIR गणना प्रपत्र भरता येत नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात पातूर नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्य (नगरसेवक) रफिकोद्दीन सौदागर यांनी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी, पातूर यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

SIR प्रणालीतील त्रुटींमुळे मतदार त्रस्त; पात्र मतदारांची नावे तातडीने समाविष्ट करण्याची मागणी
पातूर : भारत निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रणालीतील कथित तांत्रिक अडचणींमुळे पातूर शहरातील अनेक पात्र मतदारांची नावे ऑनलाईन मतदार यादीत दिसत नसल्याने त्यांना SIR गणना प्रपत्र भरता येत नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात पातूर नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्य (नगरसेवक) रफिकोद्दीन सौदागर यांनी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी, पातूर यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पातूर शहरातील अनेक नागरिकांकडून SIR प्रणालीबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. सैय्यदपुरा येथील फारूक हुसेन अल्ताफ हुसेन तसेच किल्ला बाग येथील सय्यद मसीयोद्दीन सय्यद अमिनोद्दीन यांच्यासह अनेक पात्र मतदारांची नावे यापूर्वीच्या मतदार यादीत होती. तसेच त्यांनी २०२६ मधील नगर परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावला होता. मात्र, सध्या ऑनलाईन मतदार यादीत त्यांची नावे दिसत नसल्याने त्यांना SIR गणना प्रपत्र भरता येत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, संबंधित नागरिकांनी याबाबत बीएलओ (BLO) यांच्याकडे चौकशी केली असता, SIR प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून प्राप्त होत असून, ही समस्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवक रफिकोद्दीन सौदागर यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन SIR प्रणालीतील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर कराव्यात, पात्र मतदारांची नावे प्रणालीमध्ये समाविष्ट करावीत आणि सर्व पात्र नागरिकांना SIR गणना प्रपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला, उपविभागीय अधिकारी, बाळापूर तसेच संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

