Electric Shock :तालुक्यातील जामवसु शिवारात भाजीसाठी गोंधणीच्या झाडावरील फुलोरा तोडताना विजेचा धक्का बसून एका आदिवासी मजूर महिलेचा गंभीर अपघात झाल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. या दुर्घटनेत संगीता किसन तिवाले (२५) या महिलेच्या डोक्याला, कमरेला, पायाला तसेच चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अकोला येथील डॉ. अंकुश कराळे यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बबन इंगळे
बार्शीटाकळी : तालुक्यातील जामवसु शिवारात भाजीसाठी गोंधणीच्या झाडावरील फुलोरा तोडताना विजेचा धक्का बसून एका आदिवासी मजूर महिलेचा गंभीर अपघात झाल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. या दुर्घटनेत संगीता किसन तिवाले (२५) या महिलेच्या डोक्याला, कमरेला, पायाला तसेच चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अकोला येथील डॉ. अंकुश कराळे यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता तिवाले या शनिवारी जामवसु शिवारातील एका शेतात मजुरीचे काम आटोपून दुपारी घरी परतत होत्या. दरम्यान, भाजीसाठी गोंधणीच्या झाडावरील फुलोरा तोडण्यासाठी त्या झाडावर चढल्या. मात्र, झाडालगत गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला आणि त्या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेची माहिती महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने फुलोरा तोडण्यासाठी झाडाची फांदी जमिनीवरून ओढल्याने त्यालाही विजेचा हलका धक्का बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
जखमी संगीता तिवाले यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नाईक जाम येथील आदिवासी वस्तीत आई-वडिलांच्या सहकार्याने छोट्याशा जागेवर अतिक्रमण करून त्या आपल्या चिमुकल्या मुलीसह झोपडीत राहत आहेत. अशा परिस्थितीत उपचारांचा मोठा खर्च पेलणे त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण ठरत आहे.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत डॉ. अंकुश कराळे यांनी रुग्णाच्या परिस्थितीची दखल घेत हॉस्पिटलच्या वतीने सवलतीच्या दरात उपचार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच धाबा येथील दत्त क्लिनिकचे डॉ. योगेश टापरे यांनीही या घटनेची माहिती देऊन मदतीचा प्रयत्न केला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या या आदिवासी महिलेच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

