Elderly woman struck :शहरातील गोकुळ हॉटेलजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या बुलेट मोटारसायकलने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून, मोटारसायकल चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रस्ता ओलांडणाऱ्या आजीला बुलेटने उडवले; निष्काळजी वाहनचालकावर कारवाई
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील गोकुळ हॉटेलजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या बुलेट मोटारसायकलने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून, मोटारसायकल चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश संजय झिने (वय ३२, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणातील आरोपी राहुल प्रसाद डोईफोडे (वय अंदाजे ३०, रा. डोईफोडे वाडी, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादीची आजी येणुबाई कंकाळ या ग्रामीण रुग्णालयासमोरून सम्राट कॉलनीकडे जात होत्या. गोकुळ हॉटेलजवळ चिखली–देऊळगाव राजा मार्ग ओलांडत असताना आरोपी हा एमएच-२८ बीयू-६२९९ क्रमांकाची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल उंबरखेड फाट्याकडून भरधाव व निष्काळजीपणे चालवत आला. त्याने वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
या अपघातात येणुबाई कंकाळ यांच्या छाती, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अपराध क्रमांक ३१९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा चमकूरे यांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक फौजदार नायबराव मोगल हे पुढील तपास करीत आहेत.

