Dongaon police : मेहकर तालुक्यात अवैध देशी दारूची विक्री व वाहतुकीविरोधात डोणगाव पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाया करत दोन स्वतंत्र प्रकरणांत एकूण १ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेलगाव येथे अवैध विक्रीसाठी ठेवलेल्या ३०० बाटल्या, तर आरेगाव रोडवर वाहतूक केली जात असलेल्या २४० बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या.

डोणगाव : मेहकर तालुक्यात अवैध देशी दारूची विक्री व वाहतुकीविरोधात डोणगाव पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाया करत दोन स्वतंत्र प्रकरणांत एकूण १ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेलगाव येथे अवैध विक्रीसाठी ठेवलेल्या ३०० बाटल्या, तर आरेगाव रोडवर वाहतूक केली जात असलेल्या २४० बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या. या दोन्ही कारवायांमध्ये दोन व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेलगावात ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त
१८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे डोणगाव पोलिसांनी कारवाई केली. विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अतिक्रम परशुराम किशोर (वय ३८, रा. अपेनपल्ली, मेदक, तेलंगणा; ह.मु. बेलगाव) याच्यावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांना त्याच्याकडे ‘बॉम्बी संत्रा’ देशी दारूच्या ३०० सीलबंद बाटल्या, किंमत अंदाजे १२ हजार रुपये, आढळून आल्या. तसेच ४० हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी (क्रमांक २८-१५९४) जप्त करण्यात आली. दारू व दुचाकी असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदारांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर सोनुने करीत आहेत.
आरेगाव रोडवर ६९ हजारांची कारवाई
दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० वाजता आरेगाव रोडवरील गणपती मंदिरासमोर पोलिसांनी दुसरी कारवाई केली. डोणगाव पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून एका दुचाकीवरून विक्रीच्या उद्देशाने देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी गणपती मंदिरासमोर सापळा रचला. संशयित दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश मारुती पुरी (वय ३५, रा. बायखेडा, ता. रिसोड, जि. वाशिम) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी (एमएच ३७ ए.के. ६९९१) ची झडती घेतली असता १८० मिली क्षमतेच्या ‘भिंगरी संत्रा’ देशी दारूच्या २४० सीलबंद बाटल्या, किंमत अंदाजे १९ हजार २०० रुपये, आढळून आल्या.
या कारवाईत दारू आणि ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गणेश पुरी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे करीत आहेत.
अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले
डोणगाव पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत केलेल्या या सलग कारवायांमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेते व वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

