Dongaon Bus Stop : येथील मुख्य बसथांब्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून बसस्थानक परिसराला अक्षरशः अवैध वाहनांच्या पार्किंग झोनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खाजगी वाहने आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बसथांब्यावर अवैध वाहनांचा विळखा; एसटी चालकांची कसरत, प्रवाशांची फरफट
डोणगाव : येथील मुख्य बसथांब्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून बसस्थानक परिसराला अक्षरशः अवैध वाहनांच्या पार्किंग झोनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खाजगी वाहने आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डोणगाव बसथांब्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि नागरिक प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकाच्या मुख्य परिसरातच खाजगी वाहने, लक्झरी जीप आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना नियोजित ठिकाणी थांबणे कठीण होत असून चालकांना मुख्य रस्त्यावरच बस उभी करण्याची वेळ येत आहे.
बसस्थानकात जागा उपलब्ध नसल्याने एसटी बस रस्त्यावर उभी राहत असून प्रवाशांना वाहतुकीच्या गर्दीतून धावत बस गाठावी लागत आहे. यामुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक बसस्थानक परिसरातच वाहने उभी करून प्रवाशांना आकर्षित करीत आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम होत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसत आहे. नियमांची सर्रास पायमल्ली होत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
“बसथांब्यावर पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. महिला व लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, डोणगाव बसथांब्यावरील अवैध पार्किंग आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करून परिसर वाहतूकमुक्त करावा, तसेच नियमित पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.

