Dispute Between Neighbors : शहरातील माळीपुरा परिसरात घरातील सांडपाण्याचा पाइप रस्त्यालगतच्या चेंबरमध्ये टाकण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद मारहाण, शिवीगाळ आणि धमकीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव राजात मालकी हक्काच्या वादातून तणाव; शिवीगाळ व मारहाणीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
देऊळगाव राजा : शहरातील माळीपुरा परिसरात घरातील सांडपाण्याचा पाइप रस्त्यालगतच्या चेंबरमध्ये टाकण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद मारहाण, शिवीगाळ आणि धमकीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा ललित श्रीरंगम (वय ३०, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चेतन प्रभाकर घारेगावकर, शालिनी चेतन घारेगावकर, गणेश भास्कर दोडके, निशांत सुरेश घारेगावकर व अनिता सुरेश घारेगावकर (सर्व रा. माळीपुरा, देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. ५ मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास माळीपुरा परिसरात घरातील सांडपाण्याचा पाइप रस्त्यावरील चेंबरमध्ये टाकण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. संबंधित जागेच्या मालकीवरून शाब्दिक वाद वाढला आणि त्यानंतर मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वाद सुरू असताना त्यांच्या दिरास मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेस शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कुटुंबातील आणखी एका महिलेलाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेदरम्यान जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल व फिर्यादीच्या जबाबाच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान गीते करीत आहेत.

