Mahabreaking

[breaking_news]

Har Ghar Tiranga :हर घर तिरंगा’च्या आदेशात तफावत; बुलढाण्यात शाळांना तीन दिवस ध्वजारोहणाचे निर्देश

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांना देण्यात आलेल्या आदेशांमध्ये तफावत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा, ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तीन दिवस ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, इतर काही जिल्ह्यांमध्ये केवळ १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

zp buldana

इतर जिल्ह्यांत १५ ऑगस्टलाच ध्वजारोहण; बुलढाण्यात १३ ते १५ ऑगस्टपर्यंत आदेश

सिंदखेडराजा : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांना देण्यात आलेल्या आदेशांमध्ये तफावत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा, ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तीन दिवस ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, इतर काही जिल्ह्यांमध्ये केवळ १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्हा परिषद विभागाने जारी केलेल्या शासकीय परिपत्रकानुसार, स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत शाळांमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांच्या आयोजनाचा हा उपक्रम सकारात्मक असला तरी ध्वजारोहणाबाबत देण्यात आलेल्या तीन दिवसांच्या निर्देशामुळे शिक्षकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस ध्वजारोहण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इतर जिल्ह्यांत मात्र एकाच दिवसाचा आदेश

दरम्यान, बुलढाणा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून १५ ऑगस्ट रोजीच ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभर एकसमान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या उपक्रमांमध्ये जिल्हानिहाय वेगवेगळे आदेश का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शाळांमध्ये ध्वजारोहणाबाबत नेमकी कार्यपद्धती कोणती, याबाबत शिक्षकांमध्ये चर्चा सुरू असून प्रशासनाने याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी होत आहे.

“इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद विभागाने एक दिवस ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले असताना बुलढाणा जिल्ह्यात वेगळे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी ध्वजारोहणाबाबत एकसमान आदेश असायला हवा,” अशी मागणी महाराष्ट्र सर्व शाळा शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे पदाधिकारी भानुदास लव्हाळे यांनी केली आहे.

दरम्यान, ध्वजारोहणाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top