Mahabreaking

[breaking_news]

Devastating Fire :दिल्लीतील चार मजली इमारतीत भीषण आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Devastating Fire : राजधानी दिल्लीतील पालम परिसरातील साध नगर येथे बुधवारी सकाळी एका चार मजली निवासी इमारतीला भीषण आग लागून ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या दुर्घटनेत जीव वाचवण्यासाठी दोन जणांनी इमारतीवरून उड्या मारल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

Devastating Fire

पालममध्ये अग्नितांडव; जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या, १० जणांची सुटका

 नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पालम परिसरातील साध नगर येथे बुधवारी सकाळी एका चार मजली निवासी इमारतीला भीषण आग लागून ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या दुर्घटनेत जीव वाचवण्यासाठी दोन जणांनी इमारतीवरून उड्या मारल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. सुमारे ३० अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या मोहिमेत १० जणांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी तीन जण जखमी आहेत. आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग अतिशय वेगाने पसरल्याने इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे १० ते १५ लोक उपस्थित होते.

या इमारतीच्या तळमजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत कपडे आणि कॉस्मेटिक साहित्य साठवले जात होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी राहत होते. चौथ्या मजल्यावर टिनशेड होते, जिथपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या.

मृतांमध्ये प्रवेश (३३), कमल (३९), आशु (३५), लाडो (७०), हिमांशी (२२), दीपिका (२८) आणि तीन अल्पवयीन मुली (वय १५, ६ आणि ३ वर्षे) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनिल (३२) व दोन वर्षांची मुलगी यांच्यावर IGI रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सचिन (२९) यांना २५ टक्के भाजल्यामुळे सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी एस. के. दुआ यांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यावर खाली आगीच्या ज्वाळा आणि वर प्रचंड धूर होता. त्यांच्या पथकाच्या आगमनापूर्वीच दोन जणांनी इमारतीवरून उड्या मारल्या होत्या.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारी म्हणून परिसरातील इतर इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही दु:ख व्यक्त करत मदतीचे आवाहन केले आहे.

 

 इंदूरमध्ये इलेक्ट्रिक कार चार्ज करताना घराला आग, आठ ठार

इंदूर : येथे एका घरात इलेक्ट्रिक कार चार्ज करताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागून ८ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. ही घटना पहाटे ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास घडली.आगीत संपूर्ण तीन मजली घर जळून खाक झाले. कारमधून लागलेली आग घरातील गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचल्याने एकामागून एक स्फोट झाले. स्फोट इतके तीव्र होते की घराचा काही भाग कोसळला. घरात डिजिटल लॉक असल्यामुळे ते वेळेत उघडता न आल्याने आत झोपलेल्या लोकांना बाहेर पडता आले नाही. मृतांमध्ये व्यापारी मनोज पुगल्या, त्यांची गर्भवती सून आणि नातेवाईकांचा समावेश आहे. स्थानिकांच्या मते, अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतरही गाड्या उशिरा पोहोचल्या, त्यामुळे नुकसान अधिक झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top