Deulgaon Raja Taluka Tops : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालात देऊळगाव राजा तालुक्याने दमदार कामगिरी करीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा निकाल तब्बल 98.87 टक्के लागला आहे. तालुक्याने सर्वच स्तरांवर दमदार कामगिरी करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.

अनेक महाविद्यालयांचा 100 टक्के परफॉर्मन्स : मुलींची आघाडी
गजानन तिडके
देऊळगावराजा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालात देऊळगाव राजा तालुक्याने दमदार कामगिरी करीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा निकाल तब्बल 98.87 टक्के लागला आहे. तालुक्याने सर्वच स्तरांवर दमदार कामगिरी करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत देऊळगावराजाने आघाडी घेतली असून चिखली (98.38%), सिंदखेडराजा (98.09%) आणि बुलढाणा (97.82%) या तालुक्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, सर्वांना मागे टाकत देऊळगावराजा अव्वल ठरला आहे.
तालुक्यातील विविध महाविद्यालयांनी उत्कृष्ट निकाल नोंदवत या यशात मोठा वाटा उचलला आहे. यशवंत आर्ट्स ज्युनिअर कॉलेज (दिग्रस बु.), श्री औंधेश्वर ज्युनिअर कॉलेज (अंधेरा), स्वामी विवेकानंद विद्यालय (देऊळगाव माही), आमेना अजीज उर्दू सायन्स ज्युनिअर कॉलेज, समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय (पांगरी), शरदचंद्र पवार सायन्स ज्युनिअर कॉलेज तसेच श्री संभाजीराजे उच्च माध्यमिक विद्यालय यांनी 100 टक्के निकाल देत विशेष कामगिरी बजावली आहे.
याशिवाय सहकार महर्षी भास्करराव शिंगणे विद्यालय (99.13%), आदर्श ज्युनिअर कॉलेज सिंदगाव जहांगीर (99.65%), महात्मा ज्योतिबा फुले ज्युनिअर कॉलेज (96.96%), छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल (96.92%) आदी संस्थांनीही उच्च टक्केवारीसह दर्जेदार निकाल दिला आहे.
तालुक्यातील बहुतांश शाळांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक निकाल नोंदवत सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. विशेष म्हणजे अनेक संस्थांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
दरम्यान, यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी करत आपली आघाडी कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीही विशेष गुणवत्तापूर्ण निकाल देत तालुक्याच्या यशात भर घातली आहे.
टक्केवारीच्या प्रमाणावरून जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुका निकालाच्या बाबतीत अव्वल ठरल्याचे स्पष्ट होते. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी अभिनंदन करत त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, “भविष्यातही अभ्यासात सातत्य राखून अशाच प्रकारे यश संपादन करावे,” असा सल्ला दिला. तसेच या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच असेच यश यापुढेही मिळवावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पुढील वाट निवडताना घाई न करता, विचारपूर्वक आणि माहितीपूर्ण निर्णय घ्या. ही तुमच्या नव्या प्रवासाची सुंदर सुरुवात आहे. गुण महत्त्वाचे असले तरी तुमची जिद्द, कौशल्य, मेहनत आणि योग्य निर्णयक्षमता हेच पुढील यश निश्चित करणार आहेत.स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
मनोज कायंदे,आमदार, सिंदखेड राजा मतदार संघ
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

