Palkhi procession: शहरातील माळीपुरा परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री संत सावता महाराजांची पालखी शहरातून भक्तिभावाने मिरविण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावात सांगता; संत सावता महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील माळीपुरा परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री संत सावता महाराजांची पालखी शहरातून भक्तिभावाने मिरविण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त ४ ते १० ऑगस्टदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उत्सव समिती, युवा उत्सव समिती तसेच समस्त समाज बांधव-भगिनी आणि भक्तगणांच्या वतीने करण्यात आले. सप्ताहात दररोज काकडा, हरिपाठ आणि सायंकाळी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. वैभव महाराज झोरे यांनी श्री संत सावता महाराज चरित्र ग्रंथाचे वाचन केले. ह.भ.प. अनिल महाराज सपाटे आणि ह.भ.प. सुरज महाराज कोळे यांनी ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण केले. सप्ताहादरम्यान ह.भ.प. वैभव महाराज झोरे, ह.भ.प. गजाननदादा शास्त्री, ह.भ.प. राजू महाराज खराडे, ह.भ.प. फरकाटे महाराज, ह.भ.प. वैष्णोदास भिकाजी महाराज मोठे, ह.भ.प. प्रमोद महाराज सानप आणि ह.भ.प. प्रदीप महाराज कायंदे यांची हरिकीर्तने झाली. काल्याचे कीर्तन संत चरणदास निकम महाराज यांनी केले.
११ ऑगस्ट रोजी सकाळी श्री संत सावता महाराज मंदिरातील मूर्तीचा महाभिषेक पवन जोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत संत सावता महाराजांचा चांदीचा मुखवटा व पादुका ठेवून झेंडेकरी, टाळकरी, वारकरी, मृदुंगाचार्य आणि गायनाचार्य यांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. पालखीने ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर ती श्री संत सावता महाराज मंदिरात परतली.
यानंतर ह.भ.प. संत चरणदास निकम महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर मंदिर समिती आणि शहरातील मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संपूर्ण सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंदिर समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.
दिवसभर शहरातील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते, सर्व नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्री संत सावता महाराज मंदिरात दर्शन घेतले.

