Mahabreaking

[breaking_news]

Dr. Shashikant Khedekar : सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत मागणी; डॉ. शशिकांत खेडेकरांचा एकनाथ शिंदेंकडे आग्रह

Dr. Shashikant Khedekar :  सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, चिखली आणि लोणार तालुक्यांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणी केलेली पिके उगवली नाहीत, तर उगवलेली पिकेही पावसाअभावी करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, पीक विम्याची तातडीने नुकसानभरपाई आणि दुष्काळी सवलती लागू करण्याची मागणी केली.

Shashikant Khedekar

 दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बळीराजासाठी खेडेकरांचा सरकारकडे आक्रमक पाठपुरावा; दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, चिखली आणि लोणार तालुक्यांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणी केलेली पिके उगवली नाहीत, तर उगवलेली पिकेही पावसाअभावी करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, पीक विम्याची तातडीने नुकसानभरपाई आणि दुष्काळी सवलती लागू करण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून त्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

या दौऱ्यादरम्यान आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले. मतदारसंघ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी आणि शासनाच्या सर्व दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. खेडेकर म्हणाले, “यंदा सुरुवातीला पेरलेले पीक उगवले नाही आणि जे उगवले तेही पावसाअभावी करपून गेले. अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. बळीराजावर मोठे आर्थिक संकट आले असून शासनाने केवळ पंचनाम्यांपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि पुरेशी नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली तरच त्यांना पुढील हंगामासाठी उभारी मिळेल.”

तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून ती प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणीही डॉ. खेडेकर यांनी केली.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत “सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ मदतीविना राहणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने मागवून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे,” असे आश्वासन दिल्याचे डॉ. खेडेकर यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही दिली असून, नुकसानाचे पंचनामे वेगाने करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न आता शासनाच्या निर्णयाकडे लागला आहे. हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, पीक विम्याची नुकसानभरपाई आणि दुष्काळी सवलतींबाबत शासनाकडून लवकर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल काबरा तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top