gas cylinder : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. सिलेंडरला लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गावातील युवकांनी प्रसंगावधान राखत धाडसाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत घरातील महिला तसेच इंडेन गॅसचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.

सिलेंडरच्या भडक्याने महिला व गॅस कर्मचारी किरकोळ जखमी; वेळीच आग विझवल्याने जीवितहानी टळली
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. सिलेंडरला लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गावातील युवकांनी प्रसंगावधान राखत धाडसाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत घरातील महिला तसेच इंडेन गॅसचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस बु. येथील देविदास इंगळे यांच्या घरी त्यांची पत्नी प्रज्ञा देविदास इंगळे या गुरुवारी सायंकाळी स्वयंपाक करीत असताना गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. सिलेंडरला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र, सिलेंडरचा भडका उडत असल्याने सुरुवातीला आग विझविण्यासाठी कोणीही पुढे जाण्याचे धाडस केले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती राहुल सोनोने यांनी वाडेगाव येथील इंडेन गॅसचे संचालक पंकज सहगल यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस कंपनीचे कर्मचारी शेषराव सरप, ओमप्रकाश बडोदिया आणि अहमद शहा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी गावातील युवकांनीही प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. मंगेश गवई, सोनू आठवले, अभिषेक चिकटे, रोहित गवई, आदित्य चिकटे, मनीष गवई, आकाश बाळू गवई, परिस गवई, सुदर्शन गवई, पंकज डोंगरे, कपिल गवई, भारत गवई, बाळू इंगळे तसेच महसूल सेवक कपिल ताले यांनी ओले पोते आणि वाळूच्या साहाय्याने सिलेंडरची आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या घटनेत प्रज्ञा देविदास इंगळे आणि गॅस कर्मचारी शेषराव सरप हे किरकोळ जखमी झाले. तसेच स्वयंपाकघरातील काही साहित्य आगीत जळून नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आल्यानंतर लिकेज असलेला सिलेंडर सुरक्षितपणे जमा करून घेण्यात आला.
गावातील युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वेळीच आग नियंत्रणात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

