Deendayal Vidyalaya: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यालय परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या नामगजराने भक्तिमय झाला.

आषाढी एकादशीनिमित्त दीनदयाल विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यालय परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या नामगजराने भक्तिमय झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य भगवानराव आरसोडे हे होते. यावेळी संदीपजी डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक महत्त्व समजावून सांगत वारकरी संप्रदायातील भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक राजेशजी भिवटे, माजी पर्यवेक्षक रमेशजी डोईफोडे तसेच शारीरिक शिक्षक राजूसिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, गवळणी, अभंग, फुगड्या आणि विठ्ठल भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण केले. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठल नामाच्या गजरात सादर झालेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला शिक्षक आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व्ही. यू. दाभाडे यांनी केले, तर नियोजन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी एस. आर. जायभाये यांनी पार पाडली.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा, भक्ती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यालयाने धार्मिक परंपरेसोबतच संस्कारक्षम शिक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या साजरा केला.

