Mahabreaking

[breaking_news]

Death was lurking under the pillow :उशीखाली दबा धरून बसला होता मृत्यू! सर्पदंशाने ११ वर्षीय सुजलचा दुर्दैवी अंत

Death was lurking under the pillow : पातूर तालुक्यातील सस्ती येथे झोपेत असलेल्या ११ वर्षीय चिमुकल्याचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी (२ ऑगस्ट) पहाटे घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे सस्ती गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  Death was lurking

  आईला उठवून म्हणाला, “माझ्या हाताला काहीतरी चावलंय”… काही तासांतच काळाने हिरावला निष्पाप जीव

राहुल सोनोने

वाडेगाव : पातूर तालुक्यातील सस्ती येथे झोपेत असलेल्या ११ वर्षीय चिमुकल्याचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी (२ ऑगस्ट) पहाटे घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे सस्ती गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सस्ती येथील सुनील वाघ यांचा मुलगा सुजल सुनील वाघ (वय ११) हा रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेला होता. झोपेतच त्याला हाताला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. घाबरलेल्या सुजलने तत्काळ आईला उठवत, “माझ्या हाताला काहीतरी चावलंय,” असे सांगितले. कुटुंबीयांनी घाईघाईने पाहणी केली असता त्याच्या उशीखाली मण्यार जातीचा विषारी साप असल्याचे दिसून आले. तो साप सुजलच्या हाताच्या बोटाला चावलेला होता.

कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत कपड्याच्या सहाय्याने साप दूर केला आणि सुजलला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि अवघ्या काही तासांतच सुजलची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

सुजल हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनाने वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. खेळण्याच्या, बागडण्याच्या वयात काळाने त्याला हिरावून नेल्याने सस्ती गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top