Daring theft : तालुक्यातील एमएससीबी (महावितरण) उपकेंद्रालगत असलेल्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ३० बकऱ्या मालवाहू वाहनातून चोरून नेल्याची धाडसी घटना घडली आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन ते चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मालवाहू वाहनातून २.७५ लाखांच्या ३० बकऱ्या लंपास; पातूर पोलिसांत गुन्हा दाखल
निशांत गवई
पातूर : तालुक्यातील एमएससीबी (महावितरण) उपकेंद्रालगत असलेल्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ३० बकऱ्या मालवाहू वाहनातून चोरून नेल्याची धाडसी घटना घडली आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन ते चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोडू तुळशीराम डाखोरे (वय ५०, व्यवसाय – मजुरी, रा. पातूर) हे ह. मु. तिडके यांच्या शेतात मजुरीचे काम करतात. संबंधित शेतात एकूण ४० बकऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. बुधवार, ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास बकऱ्यांचा आवाज व माणसांची चाहूल लागल्याने डाखोरे यांना संशय आला. त्यांनी उठून पाहिले असता तीन ते चार अज्ञात व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या मालवाहू वाहनात बकऱ्या भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी मालवाहू वाहनाच्या मागे पांढऱ्या रंगाची एक कारही उभी होती. फिर्यादी यांनी तत्काळ रस्त्याने त्या वाहनांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वाहने भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार झाली.
यानंतर फिर्यादी शेताकडे परत येत असताना रस्त्यात गुलाबी रंगाचे हँडल असलेला आणि स्टीलचे पाते असलेला एक चाकू पडलेला आढळून आला. त्यानंतर शेताची पाहणी केली असता लहान-मोठ्या मिळून ३० बकऱ्या चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादीच्या जबानीवरून पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत अज्ञात तीन ते चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस नाईक निलेश जाधव यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) चव्हाण करीत आहेत. घटनास्थळी आढळून आलेल्या चाकूसह इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांचा मागोवा घेतला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

