Crop insurance : तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला पीकविमा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग जनआंदोलन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रश्न सोडविण्याची दिलेली हमी लक्षात घेऊन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रश्नाची दखल घेत आमदार हरीश पिंपळे यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला असून बुधवारी (दि. २४) पीकविम्याबाबत सभागृहात चर्चा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

पीकविम्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनाला तात्पुरती स्थगिती; प्रश्न सभागृहात गाजणार
मूर्तिजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला पीकविमा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग जनआंदोलन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रश्न सोडविण्याची दिलेली हमी लक्षात घेऊन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रश्नाची दखल घेत आमदार हरीश पिंपळे यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला असून बुधवारी (दि. २४) पीकविम्याबाबत सभागृहात चर्चा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांचा पीकविमा तालुक्यातील सुमारे १८ हजार विमाधारक तसेच विमाविना असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळावा, या मागणीसाठी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २२ जूनपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग जनआंदोलन सुरू केले होते.
भर उन्हात आणि ४५ अंश सेल्सिअस तापमानात शेकडो शेतकरी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन न्यायाची मागणी करीत होते. आंदोलनाची तीव्रता दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. उपोषणकर्ते राजूभाऊ वानखडे यांची रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी तो नाकारत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच आंदोलनस्थळी उपस्थित असलेले उमई येथील शेतकरी गजानन बेले यांची प्रकृती बिघडल्याने पोलिस प्रशासनाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरध्वनीवरून राजूभाऊ वानखडे यांच्याशी संवाद साधून पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आजही तालुक्यातील विविध सर्कलमधील शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा दर्शविला. मात्र, पीकविम्याचा प्रश्न निकाली न लागल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

