Sumant Solanke : बदलत्या काळात पारंपरिक खेळ आणि मैदानी कसरती हळूहळू कालबाह्य होत असताना त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य जय बजरंग व्यायाम शाळा करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन सक्षम आणि सुदृढ पिढी घडविण्याचे हे कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार अकोलाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी काढले.

‘खेळाडू विद्यार्थीच घडवतील देशाचे उज्ज्वल भविष्य’; ग्रीष्मकालीन शिबिराच्या समारोपात प्रतिपादन
संजय तायडे
बोरगाव मंजू : बदलत्या काळात पारंपरिक खेळ आणि मैदानी कसरती हळूहळू कालबाह्य होत असताना त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य जय बजरंग व्यायाम शाळा करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन सक्षम आणि सुदृढ पिढी घडविण्याचे हे कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार अकोलाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी काढले.
जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावंडे होते. यावेळी क्रीडा उपसंचालक गणेश जाधव, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव,संस्थेचे संचालक प्रकाशभाऊ बिडकर, जय बजरंग व्यायाम शाळेचे जिल्हाप्रमुख गजाननराव म्हैसने, चंद्रभान अतकरे, सदानंद जाधव, श्रीकृष्ण बिडकर आणि शत्रुघ्न बिडकर,सदानंद जाधव, बाळासाहेब अतकरे,श्रावण नाटकर, पवन जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव,यांनी आपल्या मनोगतात जय बजरंग माध्यमिक विद्यालय व जय बजरंग व्यायाम शाळेच्या कार्याचे कौतुक केले. व्यायाम शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, कौशल्य, संघभावना आणि सहकार्याची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत ज्ञान, कला आणि क्रीडा क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्याचे कार्य या शिबिरातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांनी स्वर्गीय क्रीडामहर्षी तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी व्यायाम शाळेची स्थापना केली. त्यांच्या प्रेरणेतून अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे.
स्व. तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत संचालक प्रकाशभाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि व्यायाम शाळेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमात शिबिरातील विद्यार्थ्यांनी धनुर्विद्या, नेटबॉल, थ्रोबॉल, योगासने, लेझीम, मल्लखांब, लाठी-काठी, रोप मल्लखांब, सायकल मल्लखांब, योग-प्राणायाम, कवायत आणि झुंबा डान्स यांसह विविध खेळांचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे कार्य या ग्रीष्मकालीन शिबिराच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक प्रकाशभाऊ बिडकर, जय बजरंग व्यायाम शाळेचे प्रशिक्षक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रीष्म कालीन शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य शत्रुघ्न बिडकर,संचालन प्रा श्रीराम पालकर यांनी केले

