Mahabreaking

[breaking_news]

Congresss Aasud Morcha :केंद्र-राज्य सरकारविरोधात काँग्रेसचा आसूड मोर्चा; जुलमी सत्ता उलथवून टाकू : हर्षवर्धन सपकाळ

Congresss Aasud Morcha : महागाई, शेतकरी संकट, नीट पेपरफुटी, इंधन दरवाढ आणि कृषी धोरणांवरून केंद्र व राज्य सरकारविरोधात काँग्रेसने सोमवारी बुलढाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत ‘आसूड मोर्चा’ काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चातून सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Congresss Aasud Morcha

महागाई, शेतकरी संकट आणि नीट पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; बुलढाण्यात सरकारविरोधी एल्गार

बुलढाणा  : महागाई, शेतकरी संकट, नीट पेपरफुटी, इंधन दरवाढ आणि कृषी धोरणांवरून केंद्र व राज्य सरकारविरोधात काँग्रेसने सोमवारी बुलढाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत ‘आसूड मोर्चा’ काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चातून सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल करत, “शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे शोषण करणारी जुलमी सत्ता आता उलथवून टाकण्याचा निर्धार करावा लागेल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

मोर्चापूर्वी झालेल्या सभेत बोलताना सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. “२०१४ मध्ये शेतमालाला मिळणारे दर आज घसरले आहेत, तर पेट्रोल-डिझेल, गॅस, खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पीकविमा योजना कमकुवत झाली, नाफेड खरेदी थांबली, शेतमाल खरेदीत अनिश्चितता निर्माण झाली. सोयाबीन, मका, ज्वारी, कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. या परिस्थितीचे राजकीय उत्तरदायित्व केंद्र सरकारने स्वीकारले पाहिजे,” असा आरोप त्यांनी केला.

देशातील संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेवरही आघात होत असल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले, “देश वाचवण्यासाठी आता केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन भागणार नाही; लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे गरजेचे आहे. हे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत मुके, बहिरे आणि आंधळे बनले आहे.”

जिवंत देखाव्यांतून सरकारविरोधी संदेश

गर्दे हॉल येथून निघालेल्या मोर्चात शेतकरी, युवक, महिला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. विविध जिवंत देखावे आणि प्रतीकात्मक आंदोलनातून सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून बंद पडलेली दुचाकी हातगाडीवर नेण्यात आली, ट्रॅक्टरला धक्के देत डिझेल टंचाईचे प्रतीक साकारण्यात आले, तर गाढवांवर रिकामे कॅन ठेवून शेतकऱ्यांनी डिझेल उपलब्धतेचा प्रश्न उपस्थित केला.

“खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त, प्रधानमंत्री मात्र मेलोडीत व्यस्त”, “अच्छे दिन कुठे गेले?”, “शेतकरी वाचवा, देश वाचवा” अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघाले. कारंजा चौक, जनता चौक, जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

गृहविभाग पांडू हवालदाराच्या हाती

राज्य सरकारवर टीका करताना सपकाळ यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महाराष्ट्रात गृहविभाग जणू पांडू हवालदाराच्या हाती गेला आहे,” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही भाष्य केले.

 

आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदाचा समारोप : राहुल बोंद्रे

माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माझ्या जिल्हाध्यक्षपदाची सुरुवात आंदोलनातून झाली आणि समारोपही आंदोलनाने होत आहे, याचा अभिमान आहे.” त्यांनी ‘भारत जोडो यात्रा’चा उल्लेख करत पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

‘संघर्षाच्या काळात सर्वांना सोबत घेऊन काम’ : प्रकाश पाटील अवचार

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत, “हा संघर्षाचा काळ असून सर्वांना सोबत घेऊन पारदर्शकपणे काम करू. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यात काँग्रेसची भूमिका अधिक आक्रमक राहील,” असे सांगितले.

मोर्चात जिल्हाभरातील पदाधिकारी, युवक, महिला, शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. शहराध्यक्ष दत्ता काकस व सहकाऱ्यांनी मोर्चाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top