Congress takes an aggressive : परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसने या प्रकरणाला राजकीय रंग देत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संस्थेच्या विश्वस्तांना आणि काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी राजकीय दबावातून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवारी जयस्तंभ चौकात निदर्शने केली.

राहुल बोंद्रे यांना बदनाम करण्याचा डाव? काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
बुलढाणा : परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसने या प्रकरणाला राजकीय रंग देत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संस्थेच्या विश्वस्तांना आणि काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी राजकीय दबावातून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवारी जयस्तंभ चौकात निदर्शने केली.

जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी बोलताना अवचार यांनी सत्ताधारी यंत्रणा आणि प्रशासनावर हल्लाबोल करत, शिक्षण क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.
आंदोलनानंतर काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणामागील तक्रारदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेली परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था गेल्या ३३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या संस्थेविरोधात निष्पक्ष चौकशी न करता गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
प्रमाणपत्रांच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबतही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित प्रमाणपत्रे चिखली तहसील कार्यालय, नगरपालिका आणि सावरगाव डुकरे ग्रामपंचायतीने विधिवत जारी केलेली असून त्यांची नोंद अधिकृत अभिलेखांमध्ये उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे संस्थेची बाजू न ऐकता एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी प्रशासनाचा वापर होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असून, या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
“खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा काँग्रेस जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारेल,” असा इशारा प्रकाश पाटील अवचार यांनी दिल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

