Mahabreaking

[breaking_news]

Varshavas :आगरमध्ये १९ नोव्हेंबरला वर्षावास महोत्सवाचा समारोप; भंते राजज्योती यांची प्रमुख उपस्थिती!

Varshavas : आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेल्या वर्षावास महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आगर येथील तीर्थक्षेत्र विश्वशांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भंते राजज्योती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Varshavas

 बुद्धविचारांचा जागर अन् धम्मप्रबोधनाचा संदेश; विश्वशांती बुद्ध विहारात वर्षावास समारोप सोहळा!

आगर : आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेल्या वर्षावास महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आगर येथील तीर्थक्षेत्र विश्वशांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भंते राजज्योती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतम यांनी लोककल्याणासाठी गृहत्याग केला. त्यानंतर अनेक वर्षे ज्ञानसाधना करून वैशाख पौर्णिमेला त्यांना संबोधी प्राप्त झाली. पुढे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सारनाथ येथे तथागत भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना धम्मोपदेश देत धम्मचक्र प्रवर्तन केले. याच दिवसापासून बहुजनांच्या सुखासाठी आणि हितासाठी बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराला सुरुवात झाली.

बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घडवून आणलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेनंतर बौद्ध उपासक आणि उपासिका आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास महोत्सव साजरा करतात. या काळात बुद्ध विहार, सामाजिक सभागृह तसेच आपल्या निवासस्थानी एकत्र येऊन भगवान बुद्धांचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथांचे वाचन केले जाते. त्यातून धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि धम्म चळवळ अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला जातो.

याच परंपरेनुसार आगर येथील तीर्थक्षेत्र विश्वशांती बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप १९ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, जिल्हा संस्कार प्रमुख डी. एस. ननिर, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख विजय हिवराळे व त्यांची बटालियन, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष रविंद्र दारोकार गुरूजी, माजी जिल्हा महासचिव प्रा. डॉ. एम. आर. इंगळे, अकोला तालुका पश्चिमचे अध्यक्ष एकनाथ वानखडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथवाचकांना वस्त्रदान करून होणार आहे. सकाळी १० वाजता परित्राण पाठ, ११ वाजता भोजनदान, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि समारोपीय मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

या धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा धम्म उपासक, उपासिका आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन धम्म उपासक, उपासिका आणि आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top